बार, वाइन शॉपच्या बाहेर मद्यपींची भरतेय जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:38+5:302021-05-11T04:16:38+5:30
एसपी ऑफिसच्या समोर खुलेआम विक्री : पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचा कानाडोळा फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनासाठी लागू ...
एसपी ऑफिसच्या समोर खुलेआम विक्री : पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचा कानाडोळा
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनासाठी लागू केलेले निर्बंध गुंडाळून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर भजे गल्लीत खुलेआम मद्यविक्री केली जात आहे. त्याही पुढे जाऊन मद्यपी भर रस्त्यावर हातगाडीवर तसेच वाहनांमध्ये बसून मद्यप्राशन करीत असल्याचा प्रकार 'लोकमत' ने सोमवारी केलेल्या पाहणीत आढळून आला. रामानंदनगरचा घाट, आव्हाणे रस्ता, कुसुंबा परिसर, सुप्रिम कॉलनी, एमआयडीसी व खेडी रोड आदी भागातदेखील मद्याची सर्रास विक्री सुरू होती.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर काही नियम लागू केले आहेत. मद्यविक्री करणाऱ्या वाइन शॉप व बियरबारसाठीदेखील नियमावली तयार करण्यात आलेली आहे. बारमध्ये बसून मद्यप्राशन करण्यास सक्त मनाई आहे. बार व वाइन शॉप या दोन्ही आस्थापनांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मध्ये विक्री करण्यास परवानगी आहे, मात्र ती जागेवर नाही तर घरपोहोचसाठी आहे.
'लोकमत'ने सोमवारी केलेल्या पाहणीत दुपारी बारा वाजता भजे गल्लीत हातगाड्यांवर ठिकठिकाणी मद्यपी मद्यप्राशन करीत होते. या भागात मद्य विक्री करणारे हॉटेल व वाइन शॉपदेखील आहेत. दोन्ही ठिकाणांहून मद्य विक्रीही होत होती. त्यातूनच पाण्याच्या बाटल्या घेऊन काही ग्राहक हातगाड्यांवर बसून मद्य प्राशन करीत होते. विशेष म्हणजे या रस्त्याने गणवेशधारी पोलिसांचादेखील वावर सुरू होता, मात्र कोणत्याच पोलिसाने मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीस हटकले नाही. एक पोलीस तर मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांच्या शेजारीच ओळखीच्या व्यक्ती जवळून तंबाखू घेऊन खात होता.
नेरी नाका चौकातही उघड्यावर मद्यप्राशन
नेरी नाका चौक, लक्झरी थांबा व पेट्रोलपंपाला लागून काही जण मद्यप्राशन करीत होते. एका ठिकाणी तर रस्त्याला लागून चारचाकी लावण्यात आलेली होती. त्यात तीन जण मद्यप्राशन करीत होते. दुपारी एक वाजता ‘लोकमत’ने हा प्रसंग टिपला. रामानंदनगर घाटाच्या खालीदेखील मोकळ्या जागेत काही जण मद्यप्राशन करीत होते. त्याशिवाय कॉलेज परिसरातदेखील तरुणांचा घोळका मद्यप्राशन करीत असताना नजरेस पडला.
एमआयडीसीत धाकच संपला
एमआयडीसीत तर कुसुंबा गावाच्या अलीकडे महामार्गाला लागूनच असलेल्या परमिट रूममधून सर्रासपणे मद्य विक्री केली जात होती. या भागात लाॅकडाऊन असो किंवा कोणतेही निर्बंध बिनधास्तपणे मद्य विक्री केली जाते. सोमवारीदेखील बारमधून मद्य विक्री केली जात होती व काही अंतरावर मद्यपी मद्यप्राशन करीत होते. खेडी येथेदेखील असाच प्रसंग नजरेस पडला. कंजरवाडा भागात तर मद्य विक्री करणारे लोकांना थांबून मद्याचे विचारणा करताना आढळून आले. या भागात सकाळी दहा वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री केली जाते.
बिबानगरातही अवैध मद्याची चलती
सावखेडा शिवारात असलेल्या बिबानगरात दुधाच्या बूथजवळ काही जण अवैधरित्या मद्याची विक्री करताना आढळून आले. या भागातील नागरिकांनी मद्य विक्रीबाबत तालुका पोलिसांना वारंवार कळविले, मात्र त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
काय आहे नियम?
मद्य विक्री करण्यासाठी बार व वाइन शॉप यांना शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे. गर्दी होऊ नये यासाठी कोणत्याही आस्थापनाला ग्राहकाला बसायला जागा देऊन मद्य विक्री करता येणार नाही, ग्राहकाला घरपोहोच मद्य पुरविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत मद्य विक्री करता येऊ शकते. दरम्यान, मद्य घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलीस कारवाईचा सामना करावा लागत असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई न करण्याबाबतचे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना पाठवलेले आहे.