जळगावात पावणे दोनशे वर्षांची परंपरा कायम, हळदीचा भंडारा उधळत ओढल्या बारागाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:12 PM2018-04-15T12:12:44+5:302018-04-15T12:12:44+5:30
जुन्या जळगावात उत्साह
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १५ - हळदीच्या भंडाऱ्याची उधळण, ढोल ताशांचा गजर व खंडेराव महाराज यांचा जयजयकार अशा भक्तीमय वातावरणात जुन्या जळगावमधील पांझरापोळ जलकुंभानजीक शनिवारी सायंकाळी खंडेराव महाराज यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला.
दीडशे ते पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या या बारागाड्या ओढण्यासाठी तरुण कुढापा मंडळाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. भगत नाना रवींद्र धनगर यांनी बारागाड्या ओढल्या. तत्पूर्वी हळदीचा भंडारा उधळण्यात आला व त्यानंतर भगत धनगर यांच्या घरासमोर असलेला भव्य ३० फुटी ध्वज घेऊन भगत व त्यांच्या सहकाºयांनी खंडेराव महाराज मंदिराला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले. त्यानंतर बारागाड्यांनाही पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. सोबत असलेला ३० फूटी ध्वज बारागाड्यांवर ठेवण्यात आला भंडाºयाची जोरदार उधळण सुरू झाली. यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्याहस्ते पूजन करण्यात येऊन बारागाड्या ओढण्यात आल्या. पांझरा पोळ चौक ते भाग्यलक्ष्मी चौकापर्यंत या बारागाड्या ओढण्यात येऊन तेथून भगत धनगर पुन्हा खंडेराव मंदिरात जाऊन तेथून घरी गेले व त्या ठिकाणी त्यांच्या हातात बांधण्यात आलेले पंचधातूचे कडे उतरविण्यात आले. या वेळी इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करण्यात आली.
तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष संदीप भावसार, उपाध्यक्ष सचिन चौधरी, सचिव राजेंद्र पाटील यांच्यासह रामचंद्र पाटील, विशाल धनगर, मुन्ना परदेशी, भैया ठाकूर, कुंदन चौधरी, नारायण कोळी, आबा चौधरी, आनंद चौधरी, डिगंबर पाटील, प्रशांत सुरडकर आदींनी सहकार्य केले.
वर्षानुवर्षाची ही अखंड परंपरा सुरू असून त्यात जुन्या जळगावातील रहिवासी व शहरवासीय सहभागी झाले होते. त्यामुळे जुन्या जळगावात चैतन्याचे वातावरण होते. या परिसरातील घरांच्या गच्चीवर उभे राहून बारागाड्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
बारागाड्या निमित्त या ठिकाणी खाद्य पदार्थासह खेळण्याच्या दुकानाही लावण्यात आल्या होत्या.
गुढीपाडव्याच्या पूर्वीपासून तयारी
बारागाड्यादरम्यान ठेवण्यात येणा-या ध्वजाची काठी धुण्यासाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला (कर) ती शिरागड येथे नदीपात्रात नेण्यात येते. तेथे ही काठी धुवून तेव्हापासून बारागाड्याची तयारी केली जाते.