अक्षयतृतीयेच्या बालपणीच्या मोरपंखी आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:21 PM2019-05-07T17:21:22+5:302019-05-07T17:21:34+5:30

दोंडाईचा, जि.धुळे येथील साहित्यिक लतिका चौधरी यांनी अक्षयतृतीयेच्या बालपणीच्या सांगितलेल्या आठवणी वाचा...

Barapunkhi memories of Akshaya Patriya's childhood | अक्षयतृतीयेच्या बालपणीच्या मोरपंखी आठवणी

अक्षयतृतीयेच्या बालपणीच्या मोरपंखी आठवणी

Next

१९८०-८५ चा काळ. ते सासरचे दिवस. सासुरवास आठवला तर अंगावर शहारे येतात. आठवू नये हेच बरे. पण आपली भारतीय परंपरा चांगल्याचा उल्लेख करून वाईटाचा अव्हेर करायला शिकवते म्हणूनच बालपण आणि बालपणीची आखाजी (अक्षय तृतीया) आजही हृदयाच्या कोपऱ्यात घर करून आहे.
वय वर्ष सहा ते चौदापर्यंतचे बालपण आजही मनाला मोरपिसाचा मुलायम स्पर्श करून जाते. जात-पात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंतचा भेद, दरी कळत नसलेल्या निष्पाप, निर्मळ जीवनाचा काळ म्हणजे बालपण. असा हा निरागस, सोनेरी, फुलपंखी काळ मीही जगले. त्या मोरपंखी आठवणीतील एक आठवण म्हणजे बालपणीची आखाजी.
सर्व जातीधर्मातील लोकं एकत्र नांदत असलेल्या गल्लीतील आम्ही पोरी, मैत्रिणी, बालसख्या एकत्र खेळत असू. घरघर (भातुकली म्हणजे भांडीभांडी) खेळणे, आट्यापाट्या, दोरीउड्या, लंगडी, हुतूतू, फुगडी, लुपाछुपी, चौपट, कवड्या, लगोºया, कचकडे, बिट्ट्या, बाहुला-बाहुली, नवरा-नवरी, गाण्यांच्या भेंड्या, उखाणी असे विविध खेळ खेळत असू.
एकमेकींशी भांडत, गट्टी फु करत, रागरुसवा विसरत पुन्हा एकत्र येत असू. त्यातच चैत्र-वैशाखातील गौराई (गौर) बसवणे हा अविस्मरणीय सण असायचा. महिनाभर रोज बालसख्यांनी सकाळी एकत्र येणे, झाडाचा झोका, गाणी, झगडणे आजही मनात पिंगा घालते.
चैत्र पौर्णिमेला सर्व गल्लीतल्या गावच्या मुली गौराई बसवत असू. लाकडाची गौर, प्रतिमा न्हावूमाखू घालून लाल वस्त्र पाटावर टाकून पूजा करून बसवत असू. हळद, कुंकू, अक्षता वाहून फुलहार चढवला जायचा. मोठी बहीण, भाऊ ओट्यावरचं कोनाडं सजवायला मदत करायचे. मी शेंडेफळ म्हणून घरकामात सूट मिळायची. पण तो वेळ शाळा, पाटी-पुस्तक, अभ्यास, आवडीनिवडी यात जास्त घालवायला आवडायचा. स्वाध्याय, पाढे तोंडपाठ झाल्यावर सायंकाळी ओट्यावर, अंगणात, झाडाखाली आवडता खेळ खेळायचो.
गौराईच्या दिवसात सकाळी लवकर जागायचो. तांब्याचा तांब्या मातीने, राखेने चकचकीत घासायचा. त्यात पानी भरायचे. नागवेलीची किंवा आंब्याच्या झाडाची पाने तांब्याच्या तोंडावर ठेवायची. मध्ये बसेल असा काळ्या चिकण्या मातीचा घट्ट गोळा पानाच्या मध्ये ठेवायचा. त्यावर सुती कापड ठेवून कोरडी माती गाळून चिकन लेप द्यायचा. तांब्याच्या भोवती चंदन, हळद कुंकूची बोटे ओढायची. नारळाशिवायचा हा बालपणीचा मंगलकलश असायचा. रुमालाची किंवा जुन्या फडक्याची चुंबळ डोक्यावर ठेवून त्यावर कलश ठेवायचा.
आम्ही सख्या-स्कर्ट, परकर पोलकी घालून, हातात नया पैशाच्या प्लॅस्टिकच्या रबरी बांगड्या, गळ्यात द्राक्षरंगाचे काचेच्या मण्यांची माळ, कानात साधे डूल, पायात गिल्लटचे काळेकुट्ट चाळ असे काचकथिलही सोन्याचा, हिºयामोत्याचा आनंद देत असे. अर्थात ते माहीतही नव्हतं. तो आनंद, ते रमणीय बालपण, तो निरागसपणा, निष्पाप जगणं सोन्याचं आयुष्य घडवत होतं. त्यावेळी पार्लर, मेकअप हे गावीही नव्हतं. कुंकू ओला करून ओठ लालसर करायचो. चुलीवरच्या तव्यावरचं काळं काजळ म्हणून हौसेनं डोळ्याच्या कडांना लावायचो. आईच्या हातचा धपाटाही खायचो. कुठलं तरी खाकी पावडर एखाद्या मैत्रिणीकडे असलं म्हणजे आमच्या मानाने ती खूप श्रीमंत, सुखदायी गोष्ट. भाव खात ती थोडंसं आम्हालाही देई. केसांना कधी तेल तर कधी पानी लावून चापूनचुपून, करकचून दोन वेण्या रिबिनी लावून बांधून दिल्या जायच्या. एखाद्या सिनेमाचं पोस्टर बघून, नखरा म्हणून हिरोईनसारखे दोन्ही कानाजवळ केसांच्या बटा काढून सोडायचो व मखडवायचो. आईच्या शिव्या, मोठ्या भावाचा मार त्यासोबत असायचे. एकंदरीत असं नटूनथटून, मुरडत, हसत खेळत नदीवर जात असू. हसत खेळत, नाचत गात, टिपºया खेळत महिनाभर मजा करायचो.
-लतिका चौधरी, दोंडाईचा, जि.धुळे

Web Title: Barapunkhi memories of Akshaya Patriya's childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.