पातोंडा येथे सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने बडोदा बँक १५ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:01 PM2020-04-13T17:01:20+5:302020-04-13T17:02:13+5:30
सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखा १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बँकेस दिले आहेत.
पातोंडा, ता.अमळनेर, जि.जळगाव : सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखा १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बँकेस दिले आहेत.
पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखेत खातेधारकांनी सोमवारी सकाळी पैसे काढण्यासाठी एकाचवेळी तोबा गर्दी केल्याने झुंबड उडाली. बँक ग्राहकांकडून कोरोना प्रादुर्भाव संदर्भात सामाजिक अंतर व शासकीय आदेशाची पायमल्ली होत असल्याचे पाहून व बँकेच्या प्रांगणात खातेधारकांचे यात्रेचे स्वरूप आढळून आले. शेवटी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी तत्काळ गंभीर दखल घेत ही बँक १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे लेखी आदेश शाखा व्यवस्थापक अमोल पोपटघट यांना दिले.
येथील बँक आॅफ बडोदा शाखा मोठी आहे. पातोंडा, नांद्री, दापोरी, खवशी, मठगव्हाण, रुंधाटी, गंगापुरी, नालखेडा, मुंगसे आदी १५-२० गावातील मोठ्या प्रमाणात खातेधारकाची संख्या असून येथे नेहमी गर्दी असते. लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्व नागरिकांना विशेषत: मजुरी करणाºया नागरिकांना घरी बसून एक महिना होत आलेला आहे. त्यातच दैनंदिन खर्चासाठी पैसे हवेत म्हणून आणि त्यातच केंद्र सरकारने जनधन खातेदारांच्या खात्यात तीन महिने प्रति महिना पाचशे रुपये देण्याची अंमलबजावणी झालेली असताना पहिला हप्ता व विविध शासकीय योजनांचे पैसे काढण्यासाठी शेतकरी, वृद्ध महिला पुरुषांनी सकाळपासून बँकेबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली.
नोटाबंदीच्या काळात खातेधारक पायातील पादत्राणे काढून नंबर लावण्याची पद्धत पुन्हा वापरताना दिसून आली. शाखा व्यवस्थापक पोपटघाट यांनी उन्हाचे दिवस असल्याने खातेधारकांना उन्हाची तीव्रता जाणवायला नको म्हणून मंडप टाकून दिला. मात्र नागरिकांनी सर्व सुविधांचा बोजवारा करत एकमेकांवर तुटून पडतील, अशी गर्दी केल्याने शासकीय आदेशांची पायमल्ली केली.
१५ दिवस बँक बंद राहणार तर बँक ग्राहकांची, गरजू, शेतकरी, मजूर यांची फारच गैरसोय होणार आहे. उपविभागीय अधिकाºयांशी चर्चा केली. त्यांना पोलीस बंदोबस्तात बँक सुरू ठेवण्याबाबत एक मागणी पत्र ग्रामपंचायतीमार्फत तलाठी यांना दिले. बुधवारपासून बँक नियमित सुरू राहणार, खातेदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवावे.
-रेखाबाई किशोर मोरे, सरपंच, पातोंडा
बँक खातेदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकला. खातेदारांना विनंती करून आम्ही अंतर अंतरावर उभे राहण्याचे नेहमी सांगतो. अन्यथा आज ही वेळ आली नसती. प्रांताधिकाºयांशी भ्रमणध्वनेवरून याविषयी चर्चा झाली. यापुढे बँकेच्या अंतर्गत येणाºया मोठ्या गावांना वार देण्यात आले आहेत. बुधवारपासून नियमित बँक सुरू राहणार आहे. लोकांनीही कोरोनासंदर्भातले नियम पाळावे.
-अमोल पोपटघट, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, पातोंडा