शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:36 PM2018-11-23T12:36:57+5:302018-11-23T12:40:47+5:30
आर्या फाउंडेशनच्या पुढाकार
जळगाव : देशाचे रक्षण करताना प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात असून आर्या फाउंडेशन या संस्थेतर्फे श्रीरामपूर, ता.सिन्नर (जि. नाशिक) येथील केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना ६५ हजार रुपयांची मदत केली. या संस्थेतर्फे या पूर्वीही १० शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे.
देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली असून शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६५ हजार रुपयांची मदत करीत आहे.
शहिद केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना आधार
११ नोव्हेंबर २०१८ रोजी राजुरी सेक्टर मध्ये नौशेरा भागात शहिद झालेल्या श्रीरामपूर,ता.सिन्नर, जि. नाशिक येथील केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना जळगावच्या आर्या फाउंडेशनतर्फे ६५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी आर्या फाउंडेशन नाशिकचे प्रतिनिधी ऋषिकेश परमार यांच्यासह डॉ. प्रभाकर बेडसे, डॉ.श्यामसुंदर झळके, डॉ. सतीश साळुंखे, डॉ. विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे, डॉ.नितीन शाहीर, डॉ. योगेश पवार उपस्थित होते. यावेळी आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनीही शहीद जवान केशव यांच्या वडिलांचे सांत्वन केले.
कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट
कुटुंबात केवळ वडील आणि शहीद जवानाची पत्नी असून ३ दिवसांपूर्वीच शहीद जवान यांच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले. वडील डाव्या हाताने अपंग असून गावातील मंदिराची साफसफाई करून गावकरी देत असलेल्या अन्नधान्यावर उदरनिर्वाह करतात. त्यात एकुलताएक मुलगाही देशासाठी शहीद झाला.
१० शहिदांच्या कुटुंबियांना मदत
आर्या फाउंडेशनतर्फे संदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, ता.जि. नाशिक), विकास कुळमेथे (नेरळ, ता.वणी, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, ता.जि. अमरावती), चंद्रकांत गलांडे (जाशी, ता.माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता.मिरज, जि. सांगली), सुमेध वामन गवई (लोणाग्रा, ता.जि.अकोला), रवींद्र धनावडे (मोहट मेळा, ता.जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार, (रा.म्हसरूळ, नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाने ता.शिंदखेडा, जि. धुळे), कौस्तुभ प्रकाश राणे (मीरा रोड, मुंबई)
आवाहनाला दात्यांचा प्रतिसाद
शहीद झालेल्या जवानांची भर निघू शकत नाही मात्र त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे शहिद जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडियावर पाठवितात. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत जळगाव शहरातूनच नव्हे तर राज्यातून व परदेशातूनही दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव संस्थेला येत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपºयात मदतीसाठी पोहचतात संस्थेचे पदाधिकारी
राज्यात आतापर्यंत नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, सातारा, सांगली, नंदुरबार, शिंदखेडा, मुंबई, धुळे इत्यादी जिल्ह्यातील शहिद कुटुंबियांच्या घरी आर्या फाउंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने मदतीसाठी पोहचतात ही विशेष बाब आहे.
देशासाठी प्राणाचे बलिदान देणाºया शहिद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो.
डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन