कोरोना संकटात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:23+5:302021-05-29T04:13:23+5:30
जळगाव : कोरोनाच्या संकटात व्यवसाय बंद असल्याने या काळात आधार मिळावा म्हणून नियमित धान्य मोफत दिले जात असून, ...
जळगाव : कोरोनाच्या संकटात व्यवसाय बंद असल्याने या काळात आधार मिळावा म्हणून नियमित धान्य मोफत दिले जात असून, यासोबतच आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचेही धान्य प्राप्त झाले आहे. त्याचे स्वस्त धान्य दुकानांवर वितरण सुरू झाले असून, जिल्ह्यातील ९५० स्वस्त धान्य दुकानांपर्यंत ते वितरित झाले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट उद्भवले व अनेकांचा रोजगार गेला, तर अनेकांच्या पगारात कपात झाली. यात दररोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्यांचे तर अधिकच हाल सुरू झाले. तीच स्थिती यंदादेखील एप्रिलपासून उद्भवली आहे.
५ एप्रिलपासून ‘ब्रेक द चेन’ लागू केले व अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांवर विविध योजनांतील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. यामध्ये सध्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जात आहे. यात अंत्योदय योजनेंतर्गत प्रति कार्ड ३५ किलो धान्य दिले जात असून, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रति लाभार्थी पाच किलो धान्य वाटप केले जात आहे.
‘गरीब कल्याण’साठी १३,५०० मेट्रिक टन धान्य
मे महिन्यामध्ये लाभार्थ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंगर्तत प्रति लाभार्थी पाच किलो धान्य दिले जाणार आहे. यात तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिले जाणार आहे. यासाठी जिल्ह्याला १३ हजार ५०० मेट्रिक टन धान्य प्राप्त झाले असून, त्याचे दुकानांना वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यात एक हजार ९५३ स्वस्त धान्य दुकान असून, यापैकी ९५० दुकानांपर्यंत या योजनेतील धान्य पोहोचले आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी
एकूण स्वस्त धान्य दुकान १९५३
‘गरीब कल्याण’चे प्राप्त धान्य- १३,५०० मेट्रिक टन
एकूण शिधापत्रिकाधारक - १०,००६१३
अंत्योदय १,३३,४०८
प्राधान्य कुटुंब ४,७६,५२८
ई-पॉसद्वारे धान्य वितरण
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतीलदेखील धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉसद्वारे धान्य वितरित करावे लागणार आहे.