‘कोरोना’ काळात मिळतोय योगाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 09:59 PM2020-06-20T21:59:57+5:302020-06-20T22:00:04+5:30
डिगंबर महाले । अमळनेर : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची खूपच गरज आहे. एवढेच नाही तर ज्यांना हा आजार झाला ...
डिगंबर महाले ।
अमळनेर : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची खूपच गरज आहे. एवढेच नाही तर ज्यांना हा आजार झाला आहे, त्यांना या आजारातून बरे होण्यासाठीही योगासनांचीही मोठी मदत होत आहे.
येथे योगाचा हा लाभ चांगला घेतला जात आहे. एवढेच नाही तर यापूर्वीही अनेक वर्षांपासून येथे योग चळवळ चांगली रुजली आहे. पतंजली योग समितीची स्थापना ५ जानेवारी २०१० ला झाल्यापासून ते आजपर्यंत समितीने शहर आणि ग्रामीण भागामध्ये योगाचा प्रचार आणि प्रसाराचे जोमदार कार्य केलेले आहे.
वॉर्डावॉर्डात जाऊन योग वर्ग सुरू करणे, महिलांसाठी स्वतंत्र योग वर्ग सुरू करणे आदींवर समितीचा अधिक भर राहिलेला आहे. शहरात नवीन नवीन ठिकाणी नवीन ग्रुप तयार होत आहेत. त्या ग्रुपला जाऊन भेटणे आणि त्या ठिकाणी योग वर्ग सुरू करणे हे काम समितीने अतिशय उत्तम पद्धतीने सुरू केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील समिती विशेष जनजागृती करीत आहे. कोरोनापासून लांब राहायचे असेल, कोरोनामुक्ती हवी असेल तर योग किती आवश्यक आहे याबाबतदेखील समितीचे कार्य सुरू आहे.
दिलीप बहिरम यांची
१३ वर्षांपासून मोफत सेवा
येथील सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बहिरम हे गेल्या १३ वर्षांपासून अव्याहतपणे योग शिक्षक म्हणून सेवारत आहेत. कोणताही मोबदला न घेता ते ही सेवा देत आहेत. सात वर्ष त्यांनी मराठा मंगल कार्यालयात अनेकांना योगाचे धडे दिले आहे. आता गेल्या सहा वर्षांपासून ते समर्थ नगर मधील दत्त मंदिर येथे योग शिक्षक म्हणून सेवारत आहेत. रोज सकाळी सव्वापाच ते सव्वासहा असा एक तास अनेक स्त्री-पुरुष एकत्रितरीत्या त्यांच्याकडून योगाचे धडे घेतात. प्रारंभी वार्म-अप त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम, टप्प्याटप्प्याने चार वेळा सूक्ष्म व्यायाम, टप्प्याने दोनदा कपालभाती व दोनदा अनुलोम विलोम, सर्व अवयवांचे व्यायाम, शवासन, टाळ्या, हास्यासन, आणि शेवटी १५ सूर्यनमस्कार असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो. गेली १३ वर्षे हे कार्य सुरू असून क्वचितच बाहेर गावी गेले तरच त्यांच्या सेवेत खंड पडतो अन्यथा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये अव्याहत रित्या ते योग प्रशिक्षण सेवा देत आहेत. सध्या कोरोनामुळे मात्र निर्बंध आले आहे.