मनपाच्या आदेशाला रिलायन्स कंपनीकडून केराची टोपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:28 AM2021-02-18T04:28:07+5:302021-02-18T04:28:07+5:30
आदेश देऊनही पोल हटविले नाही : आता परवानगी दिलेली रद्द करण्याचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात शासकीय ...
आदेश देऊनही पोल हटविले नाही : आता परवानगी दिलेली रद्द करण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात शासकीय कार्यालयास महानेट कनेक्टिव्हीटी जोडण्याचे काम करत असलेल्या रिलायन्स जीयो कंपनीने मनपाकडे आराखडा सादर न करताच काम सुरू केले आहे. याबाबत मनपाने सात दिवसांच्या आत आराखडा सादर करून, ज्या खासगी प्लॉटवर पोल उभे केले आहेत. त्याठिकाणचे पोल काढण्याचे आदेश मनपाने रिलायन्स कंपनीला दिले होते; मात्र सात दिवसात रिलायन्स कंपनीने कोणतेही उत्तर न देता मनपाला केराची टोपली दाखविली आहे. आता मनपाने पुन्हा कंपनीला नोटीस बजावली असून, तत्काळ पोल न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
शहरात महानेटचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. ज्या भागात महानेटद्वारे पोल उभारले जाणार आहेत, त्या भागात पोल उभारण्याआधी कंपनीने मनपा प्रशासनाकडे आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र कंपनीने शहरातील अनेक भागात मनपाची परवानगी न घेताच पोल उभारले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार सादर केली, तसेच याबाबत ‘लोकमत’ ने हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर मनपाने कंपनीला नोटीस पाठवून आठवडाभरात आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र कंपनीने आराखडा सादर केलेला नाही. आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर आता मनपाने पुन्हा कंपनीला नोटीस पाठविली आहे.
तर संपूर्ण कामाची परवानगी रद्द करू
शहरातील अनेक भागात पोल उभारत असताना स्थानिक नागरिकांची व मनपाचीही परवानगी घेतलेली नाही, तसेच काही ठिकाणी कंपनीने अनधिकृत खसगी जागेवरदेखील पोल उभारले आहेत. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तसेच काही ठिकाणी पाेल उभारण्याचे काम सुरूच असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंपनीने आता हे काम थांबवावे, तसेच नोटीसीला उत्तर द्यावे, कंपनीने उत्तर न दिल्यास संपूर्ण कामाची परवानगी रद्द करण्यात येईल, तसेच कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.