मनपाच्या आदेशाला गाळेधारकांकडून केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:10+5:302021-03-05T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याच्या रकमेसह नुकसानभरपाईच्या नोटिसा मनपाने बजावल्या आहेत. तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याच्या रकमेसह नुकसानभरपाईच्या नोटिसा मनपाने बजावल्या आहेत. तसेच बुधवारी मनपा उपायुक्तांनी प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाच्या आदेशाला गाळेधारकांनी केराची टोपली दाखविली आहे. कारण, एकाही गाळेधारकाने मनपाकडे थकीत भाड्याची रक्कम भरली नाही. यामुळे आता मनपा प्रशासन ‘ॲक्शन’मध्ये येण्याची शक्यता असून, सोमवारपासून मनपाकडून कारवाईला सुरुवात होणार आहे. याबाबत मनपा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागासह इतर विभागालाही तयार राहण्याचा सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील वाढत जाणाऱ्या समस्या व त्या समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे नसलेला पुरेसा निधी यामुळे मनपा प्रशासन गाळे कारवाईच्या तयारीत आहे. मनपाने सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान सर्वच मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा बजावून थकीत रक्कमा भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, या चार महिन्यातदेखील एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम भरली नाही. आता पुन्हा मनपा प्रशासनाने गाळेधारकांना सूचना दिल्या असून, आताही गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरण्यास नकार दिला आहे.
मनपाची तयारी पूर्ण, कारवाई अटळ
मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच ही रक्कम न भरल्यास गाळे सील करण्याची सूचना दिली आहे. मनपाकडून गाळे कारवाईबाबत किरकोळ वसुली विभागातील अधिकाऱ्यांसह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्याही अधिकाऱ्यांना तयार राहण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच पहिल्या टप्प्यात मोठे थकबाकीदार गाळेधारक मनपाच्या रडारवर राहणार आहेत. याबाबतची यादी देखील मनपाने तयार केली असून, पहिल्यांदाच मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा नाही
मनपा प्रशासनाने गाळेधारकांबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणाबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवू दिला नाही. आता पुढील कार्यवाहीसाठी मनपा प्रशासन या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी वेळ खर्ची करण्याचा तयारीत नसल्याचाच मूड मध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने काम पूर्ण केले असून, पदाधिकारी जो निर्णय घेतील तो त्यांनी घ्यावा मात्र, प्रशासन आता तयारीत असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.