बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:53 PM2018-03-27T12:53:33+5:302018-03-27T12:53:33+5:30
कमी पावसामुळे उत्पादन घटून दर्जावरही परिणाम
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - पावसाचे कमी प्रमाण व त्यातही मध्येच उघडीपमुळे तांदळाच्या उत्पादनात घट होऊन तीन वर्षानंतर तांदळाच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. यामुळे बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा सर्वच पिकांवर परिणाम झाला. मात्र तांदळाला सलग १०० दिवस पाणी आवश्यक असते, अशात मध्येच पावसाने वारंवार उघडीप दिल्याने तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. या सोबतच दर्जावरही याचा परिणाम जाणवत आहे.
एरव्ही साधारण डिसेंबर महिन्यापासून नवीन तांदळाची आवक सुरू होते. मात्र त्याची जास्त खरेदी उन्हाळ््यात धान्य खरेदी करीत असतानाच होते. यंदा एप्रिलपासून धान्य खरेदी वाढण्याचे चिन्हे असताना तांदळाचे भाव वाढले आहेत.
तांदळाचा पेराही कमी
कोणत्याही पिकाचे भाव कमी झाल्यास साधारण तीन वर्षानंतर ते पुन्हा वाढतात, असे निसर्गचक्रच आहे. गेल्या तीन वर्षांपासून तांदळाला भाव कमी मिळत असल्याने तांदूळ उत्पादकांनी यंदा तांदळाचा पेराही कमी केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात पावसाचा परिणाम झाला.
देशभरात सर्वत्र परिणाम
जळगावात विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसर या भागासह पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, कर्नाटक येथून तांदूळ येतो. यंदा या सर्व भागात पावसाचा परिणाम झाल्याने आवकही साधारण २० ते ३० टक्यांनी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जळगावच्या बाजारपेठेत यामुळे बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. गेल्या वर्षी १०५ रुपये किलोवर असलेल्या बासमती तांदळाचे भाव यंदा १२० रुपयांवर पोहचले आहेत तर चिनोर व इतर तांदळाचे भाव ३० ते ३२ रुपयांवरून ३५ ते ३६ रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे ६० रुपये असो की ७० रुपये प्रति किलो सर्वच तांदळाचेही भाव चार ते पाच रुपये प्रति किलोने वाढले आहेत.
जागतिक पातळीवर दर्जा मागे पडला
यंदा भारतात पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने ब्रह्मदेश, पाकिस्तान, थायलंड या तांदूळ उत्पादक देशांच्या तांदळाच्या दर्जाच्या तुलनेत भारताचा तांदूळ यंदा मागे पडत असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.