न्हावी- शिवरायांसाठी हजार वेळा मरणास तयार असणारा 'वीर शिवा काशीद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:20 AM2019-12-25T02:20:48+5:302019-12-25T02:21:10+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत बारा बलुतेदार या सदरात लिहिताहेत अॅड.माधव भोकरीकर...
परमेश्वर कोणाला कोणत्या कामासाठी पृथ्वीवर पाठवेल, सांगता येत नाही. त्याचे काम झाले की त्याला निष्ठूरपणे आपल्याकडे बोलावून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याने इथे धर्मसंस्थापनेसाठी पाठविले, त्यांच्या सवंगड्यांसहीत! एकेकाला काम झाल्यावर निष्ठूरपणे बोलावून घेतले. त्यातीलच वीर शिवा काशीद हा एक! याचा जन्म नेबापूर गावात, पन्हाळगडाच्या पायथ्याशी झाला.
मजबूत व्यायामाने कमावलेल्या शरीराच्या शिवा काशीदचा चेहरा आणि अंगकाठी साक्षात महाराजांसारखीच. एकीकडे सिद्धी जोहरचा पन्हाळगडाला वेढा, तर दुसरीकडे औरंगजेबाच्या मामा शाईस्तेखानाने पुण्यातील लालमहाल बळकावलेला, दोन्ही बाजूने स्वराज्यावर संकट. महाराजांनी वेढा फोडून विशाल गडाकडे जाण्याचे ठरविले, आपल्याशी साम्य असणाऱ्या शिवा काशीदला आपला पोशाख चढविला. शिवा काशीद साक्षात महाराजांसारखा दिसायला लागला. आषाढी पौर्णिमा, पाऊस मी म्हणतो, त्या अंधारात उजेड दाखवायला, वीजशलाका. अशा दोन्ही पालख्या निघाल्या. एकात महाराज आणि दुसऱ्यांत शिवा काशीद. कसाबसा वेढा फोडत बाहेर पडतात तोच कोणाच्या लक्षात आले. ठरल्याप्रमाणे एक पालखी मुख्य रस्त्याने, तर दुसरी कानाकोपºयातून. मुख्य रस्त्याची पालखी शत्रूने पकडावी म्हणून, तर कानाकोपºयातील पालखी ठिकाणावर पोहोचण्यासाठी. एका पालखीतील वीराच्या मृत्यूवर, स्वराज्याचा पोशिंदा आणि स्वराज्य जिवंत रहाणे अवलंबून होते. एक पालखी पकडली, पालखीतील स्वारासहीत सिद्धीकडे आणली गेली. अपेक्षेप्रमाणे हा बनाव असून हा 'शिवा न्हावी' असल्याचे ओळखले.
'तुला मरणाचे भय वाटत नाही?' सिद्धी शिवा न्हाव्याला विचारत होता.
'शिवाजी राजेंसाठी हजारवेळा मरायला तयार आहे. राजे कोणालाही सापडणार नाही.' शिवा न्हावी बोलला. त्याचा परिणाम - त्याचे शीर कलम झाले. हिंदवी स्वराज्य वीर शिव काशीदाची स्वराज्यासाठीची आहुती कधीही विसरू शकणार नाही. पन्हाळ गडापाशी याची समाधी आहे.
वीर शिवा काशीद. यासारखीच कामगिरी बजावली, ती 'वीर जिवा महालाने' - 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' ही अजून एक म्हण प्रचलित केली. ती अफजलखानाच्या वधाच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हार वरचेवर कलम करणाºया 'वीर जीवा महालाच्या' कामगिरीमुळे! महाराजांवर होणारा जीवघेणा वार वरच्यावर झेलला, तो 'जीवा महालाने'! सह्याद्रीचा छावा, जिवंत ठेवला!
'न्हावी' ही जात केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात आढळते. मूळ संस्कृत शब्द 'नापित'पासून निर्माण झालेला 'न्हावी', म्हणजे नखं स्वच्छ करणारा! ही जात प्राचीन आहे. शंकराच्या नाभी (बेंबी) पासून निर्माण झाले, अशी दंतकथा आहे. बुद्धाचा पट्टशिष्य उपाली न्हावीच होता. याचा इतिहास समृद्ध आहे. यांचा व्यवसाय म्हणजे केशकर्तन, केशभूषा, केशसज्जा करणे! यांच्या व्यवसायाप्रमाणे हे चारही वर्णांत आढळतात. हे हिंदू मुसलमान दोन्हींत आहेत. मात्र बहुसंख्य न्हावी हिंदू असून हिंदू देवदेवतांची पूजाअर्चना करतात, सण साजरे करतात, यात्रा करतात. मधल्या काळातील आक्रमणाने, जे विविध जातीजमातीत धर्मांतर केले गेले. त्याचा फटका या समाजाला पण बसला. यांना न्हावी, नापित, नाभिक, वारीक, महाला, म्हाली, हजाम क्षौरक, कैलासी, नायेड, खवास, महाल, भंडारी, मंगला, नायिंदा , कारागीर नावाने ओळखतात. तसेच सोरटिया, हलाइ, गोहील, जलवाडी, अताक, सोळंकी, राठोर, वाघेला, परमार, हनाइ, सेन, सैन, क्षौरकार, यजक, शीलवंत, ठाकूर, नाईपांडे, भद्री, कैलासी, चंद्रवैध, मरुथवर, शर्मा नांवाने पण ओळखतात. म्हैसूर, दक्षिणेकडील भागात यांवे मोरासू, उप्पिना, नाडीगुर, राद्धिभूमी, शिलावंत, लिंगायत, अम्बटन, मारायन, पोटभेद आहेत. कानडी पोटजातीत गोत्रे आहेत. आसाम खिंडीतील लोक कलिता जातीचे असावेत. पंजाबातील हिंदू न्हावी क्षत्रियांचे व मुसलमान न्हावी मोगलांचे वंशज म्हणवितात. काश्मिरातील यांची जात निरनिराळ्या जातींची मिळून झाली आहे. यांचा समावेश सध्या 'इतर मागास जाती' म्हणून केलेला आहे. यांच्या कुलदेवी 'जीणमाता', 'बांगडदिया सतीमाता', 'जमवाय माता' जी प्रभू रामचंद्रांच्या वंशातील 'कुश' म्हणजे 'कुशवाह वंशाची' कुलस्वामिनी आहे, 'भादरिया माता' इत्यादी आहे. यांच्यात विवाहप्रसंगी तीन गोत्रांत विवाह टाळला जातो. एक स्वत:चे, दुसरे मामाचे आणि तिसरे वडिलांच्या आईचे! विवाह हा टिकला पाहिजे, ही कल्पना मनात असल्याने घटस्फोटांचे प्रमाण कमी आहे. घरातील वडिलधाºयास जसा कत्यार्चा मान असतो, त्याच्या खालोखाल घरातील वडीलधाºया बाईला मान असतो.
गुजराथ, महाराष्ट्रातही हे न्हावी समाजबांधव लग्न जुळविण्यात मध्यस्थ असतात. गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात. सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्यावतीने मानधन सुरू असते. गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनई वादनावर पुस्तके लिहिली आहेत. (पूर्वार्ध)
-अॅड.माधव भोकरीकर, जळगाव