बाथरूमचा वास येतो, पाणी जास्त टाकत जा! बोलल्याचा राग येऊन सख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:48 PM2020-01-07T19:48:28+5:302020-01-07T19:48:40+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : ५० हजार रूपयांचा ठोठावला दंड ; पाचोरा पोलिसात होता गुन्हा दाखल
जळगाव- बाथरूमचा वास येतो, जास्त पाणी टाकत जा! असे बोलल्याचा राग येवून दीपक रामा निकम (वय-३६, रा़ हनुमाननगर, पाचोरा) यांचा मोठ्या भावाने खून केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालायाने मंगळवारी निकाल दिला असून त्यात आरोपी रावसाहेब रामा निकम (वय-४४, रा़ पाचोरा) याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावून ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
दीपक निकम हे पत्नी व मुलासह पाचोरा येथे वास्तव्यास होते़ दरम्यान, १७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास पत्नी गावाला गेली असल्यामुळे दीपक व त्यांचा मुलगा असे दोघे घरी होते़ त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ रावसाहेब निकम हा घरात आला व दोघांमध्ये बाथरूचा वास येतो या कारणावरून वाद झाला़ त्यानंतर दीपक यांनी मोठ्या भावास जास्त पाणी टाकत जा! असे सांगितले असता त्याचा राग आल्याने साहेबराव याने सुºयाने दीपक यांच्या पोटासह छातीवर वार करून गंभीर जखमी केले़ नंतर दीपक यांना जळगावातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़ परंतू, १९ एप्रिल २०१७ रोजी त्यांचा उपचार घेत अखेर त्यांची जीवनज्योती मालवली. त्यानंतर याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१७ साक्षीदार तपासले
गुन्ह्याचा तपास पोलीस निरिखक नवलनाथ तांबे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश आंधळे यांनी केल्यानंतर पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी न्यायालयात खूनप्रकरणी दोषापत्र दाखल केले़ त्यानंतर खटला हा न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात चालला़ याप्रकरणी सरकारपक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले़ त्यात मयताचा मुलगा निखील तसेच पत्नी संगिता, वहिनी अनिता तसेच डॉ़ अर्जुन सुतार, डॉ़ सचिन इंगळे, दाखल अंमलदार, पोलीस उपनिरिक्षक आऱआऱभोर, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलीस निरिक्षक नवलनाथ तांबे यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.
अन् जन्मठेपेची सुनावली शिक्षा
सरकारपक्षातर्फे अॅड. वैशाली एस़महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद करून सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्यांच आधार घेतला व सख्या भावाचा खून करण्याचे केलेले कृत्य हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे, असाही युक्तीवाद केला. त्यानंतर मंगळवारी न्या़ एस.जी. ठुबे यांनी निकालाअंती आरोपी रावसाहेबर रामा निकम यास दोषी धरून भादवी कलम ३०२ खाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला़ दरम्यान, दंडातील रक्कमेतून ४५ हजार रूपयांची रक्कम ही मयत दीपक यांच्या पत्नीस देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे़ आरोपी पक्षातर्फे अॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.