नवसाच्या विरांना केले ‘बट्टी’ने ‘शांत’
By Admin | Published: April 2, 2017 05:44 PM2017-04-02T17:44:02+5:302017-04-02T18:10:44+5:30
प्रा. हरीश पाटील व प्रा.शैलेश पाटील या बंधूंनी प्रथेप्रमाणे बोकड आणाला व त्याला मिरवून सोडून दिले आणि उपस्थितांना वरण- बट्टीचे जेवण देत एक आदर्श निर्माण केला आहे.
बळी प्रथेला फाटा : पिंपरखेडच्या पाटील बंधुंनी बोकडास सोडले जिवंत
पिंपरखेड ता.भडगाव, दि.2- चैत्र महिना आला की डोळ्यासमोर येतो नवस, शेंडीचा तसेच विराचा कार्यक्रम. अनेक कार्यक्रमात तर बोकड बळी ठरलेलाच असतो मात्र येथील विराच्या कार्यक्रमात प्रा. हरीश पाटील व प्रा.शैलेश पाटील या बंधूंनी प्रथेप्रमाणे बोकड आणाला व त्याला मिरवून सोडून दिले आणि उपस्थितांना वरण- बट्टीचे जेवण देत एक आदर्श निर्माण केला आहे.
पिंपरखेडचे प्रा.हरीश सुरेश पाटील यांचा मुलगा केतन व प्रा.शैलेश सुरेश पाटील यांचा आदित्य यांचा विरांचा शेंडी उतरवण्याचा 2 रोजी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम म्हटला म्हणजे खान्देशात डोळ्यासमोर एक दृष्य समोर येते ते म्हणजे बोकड, दारु व सैराट नाचणारे. परंतु प्रा.हरिश पाटील व प्रा.शैलेश पाटील यांनी गावात नवीन पायंडा पाडला आणि तो म्हणजे या कार्यक्रमात बोकड आणाला परंतु त्याची हत्या न करता त्याला जिवंत सोडून देत एक प्रकारे मुक्या प्राण्याला जीवदान दिले.
सकाळी वाजतगाजत त्या बोकडाची गावातून मिरवणूक काढण्यात आली नंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यांनी याप्रसंगी बोकडाचा बळी न देता वरणभात बट्टी, वांग्याची भाजी व गोड शिरा असे जेवण उपस्थितांना दिले. यावेळी आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही हजेरी लावली.
खान्देशात बोकड बळी प्रथा बंद करीत नवीन आदर्श या कार्यक़्रमातून घडला. ही प्रथा नवीन पिढीसाठी एकप्रकारे प्रेरणादायी ठरणार आहे.
-अॅड. विश्वासराव भोसले, संचालक बाजारसमिती संचालक, पाचोरा
आजच्या या निर्णयामुळे दारु पिणे व बोकड कापणे हे थांबण्यासाठी. समाजाने हा आदर्श सतत नजरेसमोर ठेवावा.
- विद्याधर पाटील, स्कूल कमेटी चेअरमन
आजची पिढी व्यसनाधीन होत आहे. अशी नवीन प्रथा पाडून निश्चित युवा पिढीत सुधारणा होईल.
- विलास पाटील, पोलीस पाटील
प्रा.हरिश पाटील यांनी गावासाठी अहिंसेचा मार्ग दाखवला आहे. याचे सर्व गावक:यांनी कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
- नितीन पाटील, माजी सरपंच