'बीसीएन' कंट्रोल रूम सील, तरीही चॅनलचे प्रक्षेपण सुरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:59+5:302021-09-22T04:18:59+5:30

एखाद्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी ज्या पद्धतीने सापळा रचला जातो व कारवाई केली जाते अशाच पद्धतीने खडका रोड रजा टॉवरसमोर ...

'BCN' control room sealed, still launching channel? | 'बीसीएन' कंट्रोल रूम सील, तरीही चॅनलचे प्रक्षेपण सुरू?

'बीसीएन' कंट्रोल रूम सील, तरीही चॅनलचे प्रक्षेपण सुरू?

Next

एखाद्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी ज्या पद्धतीने सापळा रचला जातो व कारवाई केली जाते अशाच पद्धतीने खडका रोड रजा टॉवरसमोर असलेल्या बीसीएन कार्यालयावर पोलिसांच्या तगडा बंदोबस्तासह १७ रोजी कारवाई करण्यात आली होती. मात्र बीसीएनचे कार्यालयात उघडे असून कंट्रोल रूम सील आहे.

कंट्रोल रूम सील असताना चॅनलचे प्रक्षेपण कसे?

शहरात प्रथमेश केबलचालकाच्या कार्यालयावर तगड्या बंदोबस्तासह धाड टाकण्यात आली होती. यात मलकापूरचे प्रांताधिकारी मनोज देशमुख, भुसावळचे प्रांत रामसिंग सुलाने यांच्यासह डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. त्यामध्ये त्यात भुसावळ केबल नेटवर्क कंट्रोलला सील करण्यात आले होते.

कंट्रोल रूम सील असतानासुद्धा शहरात ज्यांच्याकडेही भुसावळ केबल नेटवर्कचे केबल कनेक्शन आहे त्यांच्याकडे इतरही चॅनलचे प्रक्षेपण सुरू कसे, असा सवाल आहे.

ग्राहकांचा झाला संताप?

केबलचे पैसे भरले असतानासुद्धा अचानक प्रक्षेपण बंद झाल्यामुळे अनेक ग्राहकांचा प्रचंड संताप झाला आहे, तर अनेकांना मात्र प्रसारण व्यवस्थित असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. यात काहींचे सेटअप बॉक्स रिचार्ज संपल्यावरसुद्धा त्यांना त्याचे प्रसारण होत आहे तर ज्यांनी रिचार्ज केलाय त्यांना चॅनल दिसत नाही. काहींचा फायदा तर काहींचे नुकसान अशी स्थिती शहरात दिसून येत आहे.

दरम्यान, याबाबत बीसीएनचे संचालक शेख सलीम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, कंट्रोल रूम सील असून, येथून कुठलाही प्रक्षेपण सुरू नाही. जे ऑपरेटर्स (पॉईंन्ट्स) आमच्याकडून चॅनलचे प्रक्षेपण करत होते त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल मनस्ताप व्यक्त करून इतर चॅनलचालकांकडून फीड घेऊन प्रक्षेपण सुरू केली असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. मात्र त्यामुळे ते आम्हीच प्रक्षेपण केले आहे, असा समज होत आहे, मात्र या प्रक्षेपणाशी आमचा कुठलाही संबंध नाही. वास्तविक पाहता आमच्यावर कारवाई करण्याआधी आम्हाला १५-२० दिवसांपूर्वी नियमानुसार नोटीस देऊन कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही, असे सांगितले.

तर्कवितर्कांना उधाण

झालेली कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असे शहरात उघडपणे बोलले जात आहे. इतक्या वर्षांपासून बीसीएन केबल विविध चॅनलचे प्रसारण करत असताना कारवाई आत्ताच का झाली, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवला आहे. केबलचालकाकडून या संबंधित वेळेवर कागदपत्र देणे अपेक्षित होते, मात्र त्यांच्याकडून विलंब झाला, त्या दिवशी नेमके बीसीएनचे संचालक बाहेरगावी होते. सद्य:स्थितीत प्रक्षेपण होणार की नाही हे जिल्हाधिकारी ठरवतील. याबाबत अद्याप आम्हाला रिपोर्ट मिळाला नाही.

-रामसिंग सुलाने, प्रांताधिकारी, भुसावळ

Web Title: 'BCN' control room sealed, still launching channel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.