वीजेपासून बचावासाठी सावध रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:28 PM2019-07-03T12:28:44+5:302019-07-03T12:29:22+5:30
पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात
पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र मोकळ्या जागेत, झाडावर वीज कोसळून त्या ठिकाणी थांबलेल्या नागरिकांचा, गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी घडतात.भारतात वीज कोसळण्यामुळे होणारे जास्तीत जास्त मृत्यू हे शेतावर काम करणाऱ्या लोकांचे असतात. महाराष्टÑात विजेमुळे होणाºया एकूण मृत्यूपैकी ८६ टक्के मृत्यू शेतावर काम करणाºया व्यक्तींचे होतात. त्यामुळे कोसळणाºया विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना आसरा घेण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बंदिस्त इमारत म्हणजेच ज्याला भिंती, छप्पर, फरशी असेल असे. उदा.घर, शाळा, कार्यालयाची इमारत आदी. तसेच धातूचे बंदिस्त वाहन म्हणजेच चारचाकी वाहन त्यातही टारपोलीनचे छत असलेली वाहने सुरक्षित नाहीत. जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात किंवा पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो, तेव्हाच सुरक्षित आसरा शोधावा. वादळात बहुदा गुरेढोरे, माणसेही झाडाखाली गोळा होतात. आणि विजेच्या एका झटक्यात बळी पडतात. उंच, एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे कदाचित पाऊस लागणार नाही. मात्र वीज कोसळण्याची शक्यता तिथेच जास्त असते. तसेच मोकळ्या मैदानातही थांबू नका. किंवा अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका. वादळी हवा जाणवताच गुरांना गोठ्यामध्ये किंवा जिथे वीजप्रतिबंधक उपाययोजना असते, अशा सुरक्षित ठिकाणी न्यावे.
-नरवीरसिंग रावल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.