सावधान, संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:39+5:302021-01-20T04:16:39+5:30
जळगाव : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने, नागरिकांची संक्रांत उत्साहात पार पडली. मात्र, सक्रांतीनंतर एकमेकांना वाण देण्यासाठी महिला घराबाहेर ...
जळगाव : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने, नागरिकांची संक्रांत उत्साहात पार पडली. मात्र, सक्रांतीनंतर एकमेकांना वाण देण्यासाठी महिला घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे महिलांकडून ना मास्क ना सोशल डिस्टनिंगचे पालन होत नसल्यामुळे, या संक्रांतीच्या वाणातून कोरोनाचा संसर्ग पसण्याची दाट शक्यता निर्माण होतांना दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी बहुतांश सण आणि उत्सवांवर विरजण आले. यामुळे नागरिकांना घरात बसूनच साध्या पद्धतीने सण साजरे करावे लागले. मात्र, नववर्षात कोरोना लस आल्यामुळे नागरिकांनी नव्या वर्षातील मकरसंक्रांतीचा पहिला सण एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जाऊन उत्साहात साजरा केला. आता तर लस आल्यामुळे नागरिकांची कोरोनाबद्दलची भीती अधिकच कमी झालेली दिसून येत आहे. दरम्यान, संक्रांतीनंतर महिला या एकमेकांना संसारोपयोगी वस्तू देऊन संक्रांतीचे वाण देतात. मोठ्या संख्येने महिला एकमेकींच्या घरी एकत्र येऊन हा सण साजरा करीत असतात.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश महिलांकडून खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे, नकळतपणे कोरोनाला निमंत्रण दिले जात आहे. हा उत्सव साजरा करत असतांना महिलांनी सॅनिटायझरचा वापर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
इन्फो :
लस आली तरी धोका कायम
सध्या कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी, कोरोना गेेलेला नाही. यावर लस आली तरी, धोका कायम आहे. त्यामुळे खबरदरी म्हणून प्रत्येक मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
कोरोना पसरतोय ..
पॉझिटिव्ह मृत्यू
१४ जानेवारी - ७० ०
१५ जानेवारी - १३ २
१६ जानेवारी- ३५ ०
१७ जानेवारी- ३१ - ३
१८ जानेवारी- ४२ - १