कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयार राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:19+5:302021-05-28T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणांनी नियोजन करावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणांनी नियोजन करावे, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गुरुवारी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्सूनपूर्व तयारीचा विभागीय आढावा, महिला व बालकल्याण समितीचा आढावा, कोविड-१९ व्यवस्थापन यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, मान्सूनच्या काळात संभाव्य आपत्ती लक्षात घेता यंत्रणांनी सज्ज राहावे. प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरग्रस्त भागात शोध व बचाव साहित्य पोहोच करणे आणि चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासण्याचे आदेशदेखील गमे यांनी अधिकाऱ्यांंना दिले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनुषंगाने विभागातील कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता पडू नये, यासाठी जिल्ह्यात निर्माण केले जाणारे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प, कोविडकाळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय दक्षता नियंत्रण समितीच्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती जिल्हाधिकारी यांनी सादर केली. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये विशाखा समिती स्थापन करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही गमे यांनी केल्या आहेत.