‘बीन फेरे हम तेरे’ चे रुपांतर झाले ‘हे बंध रेशमाचे’मध्ये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:45 PM2018-03-15T21:45:42+5:302018-03-15T21:45:42+5:30
गुजराथमधील दमण येथे कंपनीत काम करीत असताना परमेश्वर नामक तरुणाचे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर तिच्याशी संसार करीत असतांना दोन अपत्य झाले. तथापि मुलाचे जावळं काढण्यासाठी विधीवत विवाह झालेला पाहिजे या रुढीप्रमाणे या दाम्पत्याचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे १४ मार्च रोजी विधीवत विवाह लावण्यात आला.
लोकमत आॅनलाईन
अमळनेर, दि.१५ : मानवी जीवनात तारुण्यात आधी विवाह त्यानंतर मुलेबाळे असा सांसरिक जीवनाचा नियम आहे. मात्र प्रेमसंबंध जुळलेल्या परमेश्वराने ‘रसीला’शी संसार करून मुले जन्माला घातली आणि मग रितसर १४ मार्च रोजी विधीवत विवाह केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. परमेश्वराच्या या विवाहात समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याच्या पित्याने खंबीरपणे पाठीमागे उभे राहून साथ दिली.
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील परमेश्वर बापू पाटील हा २००२ मध्ये नववीत असताना शाळा सोडली आणि बकऱ्या चारु लागला . मात्र मिळणाºया मोबदल्यात पोट भरणे अवघड झाले म्हणून मंगरूळ सोडले आणि गुजरातमधील दमण गाठले. तेथे फायबर पेस्टल कंपनीत कामगार म्हणून काम करू लागला. त्याच ठिकाणी गुजराथी आदिवासी तरुणी ‘रसीला’ ही देखील कामाला येऊ लागली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांवर जीव जडला. तोपर्यंत परमेश्वर तेथील लहान मोठ्या कामाचे कंत्राट घेऊ लागला. एक दिवस दोघांनी आयुष्यभर साथ राहण्याचा निर्णय घेतला आणि एका लहानशा मंदिरात जाऊन पाषाणातील देवाच्या साक्षीने परमेश्वराने रसीलाच्या गळ्यात हार टाकून तिला आपली अर्धांगिनी मानले.
दोघांचा संसार सुरू झाला. आणि त्यांच्या प्रेमाचे ‘प्रतीक’ जन्माला आले. पुन्हा दोन वर्षांनी दोघांचे प्रेम ‘उज्वल’ करणारी कन्या जन्माला आली. त्यादरम्यान परमेश्वर याच्या भावाचा मृत्यू झाला. त्याने गुजरात सोडले. त्याचा मुलगा प्रतीक ५ वर्षाचा तर उज्वला ३ वर्षांची झाली. त्या दरम्यान परमेश्वराने बोईसर गाठले. जुन्या व्यवस्थापकाच्या मदतीने कॅम्लिन कंपनीत रेयॉन खडूंना रॅपर लावण्याचे कंत्राट मिळवले आणि जीवनाची घडी व्यवस्थित बसवली. इकडे मंगरूळ ग्रामीण भाग असल्याने मराठा समाजाच्या मुलाने आदिवासी मुलगी केली म्हणून समाज नाक- तोंड मोडू लागला होता. मात्र परमेश्वराचे वडील बापू पाटील हे साधे भोळे शेतकरी, परिस्थितीने गरीब माणूस. पण विचारांनी व मनाने खूप मोठा माणूस. त्यांनी मुलाने स्वत: थाटलेल्या सुखी संसाराचा स्वीकार केला. जात , धर्म , याला फाटा देऊन आदर्श निर्माण केला.
खान्देशी रूढीप्रमाणे मुलाचे जावळं देण्याची वेळ आली, त्यावेळी कोणीतरी सांगितले की, विवाह विधीवत झालेला असावा. आणि काय बापू पाटलांनीच परमेश्वर व रसीलाचा विवाह आनंदात लावून देण्याचा निर्णय घेतला. १४ मार्चचा मुहूर्त ठरला. काही नातेवाईक, समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली मात्र त्यांच्या नाराजीला न जुमानता ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न लावण्यात आले. गावपंगतही देण्यात आली. कोण येईल आणि कोण आला नाही ? याचा विचार न करता एका गरीब शेतकºयाने मुलाच्या सुखी संसारासाठी केलेले धाडस कौतुकास्पद असून ते जातीयवाद व भावकी, गावकीच्या जोखडात गुंतलेल्या समाजाला झणझणीत अंजन घालणारेही आहे.