आता महिनाभर दाढी, कटिंग घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:19+5:302021-04-08T04:16:19+5:30
सलून बंद असल्याने सलून चालकांवर आले आर्थिक संकट : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या ...
सलून बंद असल्याने सलून चालकांवर आले आर्थिक संकट :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील वाढत जाणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये सलून व्यवसायदेखील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी देखील लॉकडाऊनमुळे अनेक महिने सलून बंद ठेवल्याने सलून व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या नवीन आदेशामुळे सलून व्यवसाय इतरांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाव्यतिरिक्त टीचर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील सलून देखील आता बंद राहणार आहेत. दररोज होणाऱ्या व्यवसायावरच सलून व्यावसायिकांचे जीवन अवलंबून आहे. दररोज व्यवसाय झाला तरच सलून व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत असतो; मात्र आता महिनाभर व्यवसाय बंद ठेवावा लागणार असल्याने अनेक व्यावसायिक आता आपल्या आपल्या गावाला जात असल्याचे चित्र देखील पाहावयास मिळत आहे. तसेच अनेकांनी घरी राहूनच दाढी, कटिंग करण्याची व्यवस्था आता सुरू केली आहे.
२२००
शहरात एकूण केशकर्तनालय
४ हजार
सलून व्यवसायावर अवलंबून व्यावसायिक
कुटुंबाचा गाडा कसा ओढावा
गेल्या वर्षी देखील तब्बल तीन महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. यामुळे अनेकांनी कायमचेच व्यवसाय बंद केले असून, आता पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने कुटुंबाचा गाडा कसा ओढावा असा प्रश्न सलून व्यावसायिकासमोर निर्माण झाला आहे.
कोट..
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचं पालन करून आम्ही आमचे व्यवसाय सुरू ठेवले होते. यामुळे आमचा उदरनिर्वाह देखील चांगल्या प्रकारे आता होत होता; मात्र पुन्हा बंद ठेवावा लागणार असल्याने आता नेमकं काय करावं हेच कळत नाही.
- हुकूम श्रीखंडे, सलून व्यावसायिक
जिल्हा प्रशासनाने सलून व्यवसाय देखील अत्यावश्यक सेवेत गणला पाहिजे. तसेच आमच्याकडे येणारे ग्राहक देखील मोठी काळजी घेतात यासह आम्हीदेखील ग्राहकांची काळजी घेत असतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काही सूट देण्याची गरज आहे.
- योगेश गगणे, सलून व्यावसायिक
आधीच पहिल्या टप्प्यात व्यवसाय बंद ठेवला असल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यातून काही प्रमाणात दिलासा मिळत असतानाच पुन्हा ठेवावा लागत असल्याने, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर असाच प्रकार व्यवसाय ठप्प राहिला तर पुन्हा आम्हाला गावालाच जावे लागेल.
- गणेश बोरसे, सलून व्यावसायिक
व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याने आमच्याकडील मजुरांना भाड्याच्या घरात राहणे देखील कठीण झाले आहे. तसेच अनेकांना कर्ज काढून दिवस काढावे लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल.
- मनीष कुंवर, पदाधिकारी, नाभिक हितवर्धक शहर संघटना