हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले

By विजय.सैतवाल | Published: February 18, 2024 11:41 PM2024-02-18T23:41:51+5:302024-02-18T23:42:37+5:30

भोलाणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

Beaten up at Haldi event, young man went home and ended his life | हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले

हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले

जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना वाद होऊन मारहाण करण्यात आलेल्या भूषण लक्ष्मण कोळी (२०, रा. भोलाणे, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही  घटना रविवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता समोर आली. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती.

तालुक्यातील भोलाणे येथे शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला. त्या वेळी भूषण कोळी याला गावातील चार जणांनी बेदम मारहाण केली होती. हा वाद नागरिकांनी मिटवला व त्यानंतर भूषण हा घरी निघून गेला होता. मात्र मध्यरात्री त्याने राहत्या घरात गळफास घेतला, अशी माहिती मयत भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी दिली.

रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भूषणने गळफास घेतल्याचे समोर आले. या वेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, पोहेकॉ विलास शिंदे आणि पोहेकॉ पाटील यांनी पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ आहे.

मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका
भूषणला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईकांची गर्दी झाली होती. मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या वेळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा हेदेखील रुग्णालयात पोहचले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मयत तरुणाची आई व इतर नातेवाईक दुपारी तालुका पोलिस ठाण्यात पोहचले होते. तेथे त्यांनी फिर्याद दिली.

चार जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक
भोलाणे येथे भूषण कोळी या तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याप्रकरणी स्वप्‍नील गोकूळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा उर्फ छोटू अरुण कोळी आणि किरण गणेश कोळी या चार जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी स्वप्‍नील कोळी, गोविंदा कोळी, कृष्णा उर्फ छोटू कोळी या तिघांना अटक करण्यात आली असून किरण कोळी याचा तालुका पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Beaten up at Haldi event, young man went home and ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.