बीअर दिली नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:26+5:302021-04-11T04:15:26+5:30
आव्हाणे शिवारातील घटना : बीअरच्या बाटल्या फोडल्या जळगाव : बीअरबार बंद केल्यानंतर बीअर दिली नाही म्हणून चौघांनी हॉटेल समोर ...
आव्हाणे शिवारातील घटना : बीअरच्या बाटल्या फोडल्या
जळगाव : बीअरबार बंद केल्यानंतर बीअर दिली नाही म्हणून चौघांनी हॉटेल समोर बाटल्या फोडून मालकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता आव्हाणे शिवारात घडली. दरम्यान, या चौघांनी हॉटेल मालकाला खून करण्याची धमकी दिली. या हॉटेलवर याआधी तीन वेळा हल्ला झालेला आहे.
या घटनेबाबत चेतन गोपाळ साळी (रा. हरिओम नगर, कानळदा रोड) यांचे आव्हाणे शहरात हॉटेल लक्ष्मी नावाचे बीअरबार आहे. शुक्रवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर धार्या भगत (रा. के. सी. पार्क), मयूर भावसार (रा. खडके चाळ) व अन्य तीन ते चार जणांनी हॉटेलच्या समोर बीअरच्या बाटल्या फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. चेतन साळी यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता नंतर ते तिथून निघून गेले. थोड्या वेळाने के. सी. पार्क जकात नाक्याजवळ चेतन साळी यांना चौघांनी अडवून ‘आम्हाला आताच बीअर काढून दे’ म्हणून दम दिला. दुकानाची वेळ संपलेली असल्याने आता दुकान उघडता येणार नाही असे साळी यांनी सांगितले असता या सर्वांनी त्यांना मारहाण केली व खिशातील २५ हजार रुपये काढून घेतले. यावेळी त्यांनी साळी यांना खून करण्याची धमकीही दिली. साळी यांनी भाऊ अमोल व योगेश यांना माहिती दिली. पैसे परत देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी आणखी काही मित्र बोलवून दहशत माजविली. दरम्यान, आम्हाला रोज दोन बीअर फुकट द्यावी म्हणून त्यांनी मागणी केली. शंभर रस्त्यावर साळी, त्यांचे भाऊ व प्रिया साळी यांना या टोळक्याने मारहाण केली. नंतर ते तेथून निघून गेले, असे चेतन साळी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
*पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा*
मारहाण व जबर लुटीची घटना घडलेली असताना शहर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळे त्यामुळे साळी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे लेखी तक्रार केली. दरम्यान, याआधीदेखील या दारू दुकानावर, तसेच मालकावर हल्ला झालेला आहे.