वीज वितरणच्या अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:10+5:302021-06-09T04:20:10+5:30
भडगाव : कार्यालयात घुसून मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा भडगाव, जि. जळगाव : महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण करणाऱ्यांना ...
भडगाव : कार्यालयात घुसून मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा
भडगाव, जि. जळगाव : महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण करणाऱ्यांना आवरण्यासाठी गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की करण्यात आली. यातच खाली पडून वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना भडगाव - चाळीसगाव रस्त्यावर वीज वितरण कार्यालयात दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन प्रताप राणे (४८, रा. बाळद रोड, भडगाव) असे या मृत वायरमनचे नाव आहे. मारहाण आणि त्यानंतर झालेल्या वायरमनच्या मृत्यूने भडगाव तालुका हादरुन गेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दोषीविरुध्द सक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पाचोरा आणि भडगाव येथे शिवसेनेच्यावतीने सोमवारी वीज वितरण कंपनीच्या दहा कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले. हे आंदोलन शांततेत पार पडले. यानंतर दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास भडगाव येथील महावितरण कार्यालयात सात जण घुसले. त्यावेळी कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (४३, रा. वृंदावन पार्क, पाचोरा) हे उपस्थित होते. आत घुसताच या सातही जणांनी धामोरे यांना मारहाण सुरू केली. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या दालनातील संगणक, युपीएस, तसेच टेबल व दालनाच्या काचा फोडल्या. याचवेळी वरिष्ठ तंत्रज्ञ
गजानन राणे हे धामोरे यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी हल्लेखोरांनी राणे यांनाही जोरदार धक्काबुक्की केली. त्यात राणे हे खाली पडले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.
यात झालेल्या झटापटीत महावितरण कार्यालयातील वस्तूंचे ५० ते ६० हजार रुपयाचे नुकसान झाले. तर राणे यांच्या मृत्यूस आणि आपणास जीवे मारण्याच्या उद्देशाने ही मारहाण करण्यात आली, असे धामोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर हल्ला आणि वायरमन मृत झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. महावितरण कर्मचाऱ्यांनी कार्यालयाकडे धाव घेत धामोरे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.