शिक्षकास प्रश्न विचारण्याचा राग आल्याने विद्यार्थिनीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 03:16 PM2019-09-25T15:16:43+5:302019-09-25T15:22:56+5:30
विद्यार्थिनीने शिक्षकास प्रश्न विचारल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांंनी मारहाण केल्याची घटना शहरातील इंग्लिश मीडियम शाळेत घडली.
भुसावळ, जि.जळगाव : विद्यार्थिनीने शिक्षकास प्रश्न विचारल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांंनी मारहाण केल्याची घटना शहरातील इंग्लिश मीडियम शाळेत घडली. यासंदर्भात विद्यार्थिनीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शिक्षकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील सेंट्रल रेल्वे इंग्लिश मीडियम शाळेत दहावीमध्ये शिकत असलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने संशयित आरोपी शिक्षक सुकांत मिश्रा यास प्रश्न विचारला. याचा राग मिश्रा यांना आला. यामुळे त्यांनी विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली व यापुढेही त्रास देईल, अशी धमकी विद्यार्थिनीस दिली. ही घटना बुधवारी सकाळी घडली.
यासंदर्भात विद्यार्थिर्नीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३२३, ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
दरम्यान, शहर पोलिसांनी विद्यार्थिनीस उपचार व प्रमाणपत्रासाठी वरणगाव येथील रुग्णालयात पाठविले. मात्र या रुग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे वरणगाव येथील रुग्णालयात उपचार करून प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनीस जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.