धरणगावात महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:10+5:302021-06-22T04:13:10+5:30
गुलाब किसन धनगर, छोटू किसन धनगर, विकास किसन धनगर अशी आरोपींची नावे आहेत. माधुरी दीपक धनगर हिने दिलेल्या ...
गुलाब किसन धनगर, छोटू किसन धनगर, विकास किसन धनगर अशी आरोपींची नावे आहेत.
माधुरी दीपक धनगर हिने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, माझ्या पतीने छोटू किसन धनगर यांना २ लाख रुपये ढोरांचा व्यापार करण्यासाठी सुमारे १ वर्षांपूर्वी दिले होते. हे पैसे माझे पती तीन-चार दिवसांपासून त्यांच्याकडून शेतीच्या कामासाठी मागत होते. हे माधुरी हिला माहीत होते. दि. २ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मी आणि माझी दीरानी वर्षा असे घरी असताना गुलाब धनगर, छोटू धनगर, विकास धनगर असे तिघेही हातात तलवार, काठ्या घेऊन घरात आले. तेव्हा त्यांना मी सांगितले की, माझे पती, सासरे व दीर हे शेतात गेलेले आहेत. घरात कुणीही नाही. तरीदेखील तिघांनी जबरदस्ती घरात घुसून घरातील सामानाची नासधूस केली. तसेच गुलाब किसन धनगर याने मला पकडून गळ्यातील १ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओढून घेतली. तसेच कपाटात ठेवलेले रोख रक्कम २ लाख ३ हजार रुपये काढून घेतले.
छोटू किसन धनगर, विकास धनगर यांनी अंगणात उभी असलेली बुलेटची तोडफोड करून नुकसान केले व मला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून तुझा पती माझ्याकडे पैसे मागतो ते मी देणार नाही, तुमच्याने जे होईल ते करून घ्या. आता तर आम्ही परत जात आहेत, पुन्हा जर तुझ्या पतीने पैसे मागितले तर त्याला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले. तेव्हा गल्लीतील किशोर दौलत कंखरे, अनिल दौलत कंखरे यांनी त्यांना समजावून घरातून काढले व माझे सासरे हे इंदिरा कन्या शाळेकडून बकऱ्या चारण्यासाठी जात असताना त्यांनाही या तिन्ही लोकांनी मारहाण केली. तसेच माझ्या पतीलादेखील मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल योगेश प्रभाकर जोशी हे करीत आहेत.