गाैताळाचे साैंदर्य खुलले, निसर्गाला जणू पर्यटन भुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:23+5:302021-09-27T04:17:23+5:30
चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या सीमेवर असलेले गौताळा अभयारण्य हे जैवविविधतेने अतिशय श्रीमंत ...
चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या सीमेवर असलेले गौताळा अभयारण्य हे जैवविविधतेने अतिशय श्रीमंत आहे. पावसाळ्यात या अभयारण्याचे सौंदर्य खुलले असते. सुंदर निसर्ग, धबधबे, प्राणी, पक्षी, दुर्मीळ वनस्पती, वनौषधी येथे पाहवयास मिळतात. जवळच असलेली पाटणादेवी, केदारकुंड धबधबा, सीतेची न्हाणी इ. सह वन्यजीव हे पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे. या सर्व कारणांमुळे हा परिसर पर्यटकांना निश्चितच भुरळ घालताे.
प्रत्येक मोसमात हे अभयारण्य आपल्या वेगवेगळ्या रूपाने सौंदर्याची उधळण करीत असल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. या अभयारण्यात विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले २६१ चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी अभयारण्य म्हणून घोषित केले.
कन्नडहून दोन कि.मी. पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडं, प्राणी, पक्षी पाहायला मिळतात.
अभयारण्यात बिबट्या, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यासह इतर ५४ प्रजातींचे प्राणी तर २३० प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.
प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकूंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.
भास्काराचार्यांचे पीठ
या अभयारण्याजवळ पाटणा येथे निकुंभ राजवंशानी बांधलेले बाराव्या शतकातील पुरातन मंदिर आहे. चंडिकादेवी मंदिरापासून काही मीटर अंतरावर गणित आणि खगोलतज्ज्ञ भास्काराचार्यांचे पीठ आहे. जिथे बसून त्यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात अनेक गणिती सिद्धांत मांडल्याचे बोलले जाते.
पाटणदेवीच्या हिवरखेडा प्रवेशद्वारातून पर्यटक - अभयारण्यात प्रवेश करू शकतात. पुरणवाडी आणि पाटणादेवी येथे वन विभागाची विश्रांतीगृहेही पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत.
कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर चंदन नाला लागतो. तिथे मोर, पोपट यासह सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबूल, कोतवाल, चंडोल असे विविध रंगाचे पशुपक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. पुढे एक मारूतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या परिसरात पूर्वी गवळी लोक रहायचे, त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या त्यावरून या तलावाला गौताळा तलाव असे नाव पडले. पुढे हेच नाव या अभयारण्यालाही मिळाले.
गौतम टेकडी
औरंगाबाद-कन्नड रोडला डावीकडे पितळखोऱ्याच्या लेण्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ डोंगररांगात कोरलेल्या या लेण्याही पर्यटकांना आकर्षित करतात. गौताळा तलावाच्या पुढे एक उंच टेकडी आहे. या टेकडीवर एक गुहा आहे. त्यात एक पाण्याची टाकी आहे. गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले, असे म्हटले जाते. यामुळेच या टेकडीला गौतम टेकडी असदेखील म्हणतात. येथे पवण्या, लव्हाळी, हरळी, कुसळी, नागरमोथा, सफेद मुसळी, शतावरी, अमरवेल, जंगली लवंग, गौळणा, हरणखुरी, रानकेळी, मनचंदी म्हाळू, गोमिळ्या, धोळ, म्हाकोडी, दौडी, तामूलकंद, खरबुरी, हामण, वढदावा, सुलेकंद अशा आयुर्वेदाला उपयुक्त वनस्पती अभयारण्यात विपुल प्रमाणात आहेत.
260921\26jal_7_26092021_12.jpg~260921\26jal_8_26092021_12.jpg
गाैताळाचे साैंदर्य खुलले, निसर्गाला जणू पर्यटन भुलले~गाैताळाचे साैंदर्य खुलले, निसर्गाला जणू पर्यटन भुलले