नेत्यांचे दुर्लक्ष आणि वाढत गेलेली गटबाजी भाजप फुटीचे ठरले कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:17+5:302021-03-19T04:16:17+5:30
महापालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शहराचा चेहरामोहरा अवघ्या वर्षभरात बदलवून दाखवू, अशी हाक देत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ...
महापालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शहराचा चेहरामोहरा अवघ्या वर्षभरात बदलवून दाखवू, अशी हाक देत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत भाजपला सत्ता देण्याचे आवाहन जळगावकरांना केले. आणि जळगावकरांनीदेखील महाजन यांच्या हाकेला साथ देत महापालिकेत ७५ पैकी तब्बल ५७ नगरसेवकांना जिंकून देत भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले. या ऐतिहासिक बहुमतानंतर जळगावकरांना शहराचा विकास हीच एकमेव अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून होती. मात्र, वर्षभरातच भाजपमधील गटबाजीने तोंड वर करायला सुरुवात केली. इतर पक्षांतून भाजपत आणलेल्या नगरसेवकांचे गटतट भाजपमध्ये निर्माण झाले आणि यामध्येच सत्ताधारी भाजप विखुरली गेली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या शब्दानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र गटातटात विभागल्या गेलेल्या भाजपला या निधीचे नियोजनदेखील करता आले नाही. खाविआच्या काळात सर्व नेतृत्व हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडेच होते. त्यामुळे महापालिकेत ३३ ते ३५ जागा असतानादेखील संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ खाविआने पूर्ण केला. मात्र त्याच ठिकाणी भाजपला तब्बल ५७ जागा असतानादेखील अवघ्या अडीच वर्षभरातच सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. याचे एकमेव कारण हेच भाजपत अनेक सत्ताकेंद्रे निर्माण झाली होती. आमदार सुरेश भोळे, कैलास सोनवणे, सुनील खडके, ललित कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीमधून आलेल्या नगरसेवकांचा एक गट अशा अनेक गटांमध्ये सत्ताधारी भाजप विखुरली गेली होती. यामुळे विकासकामांनादेखील ब्रेक लागला. या सर्व गटांवर नियंत्रण ठेवून भाजप एकसंघ करण्याचे काम माजी मंत्री गिरीश महाजन यांचे होते. मात्र संकट मोचक गिरीश महाजन यांनी जळगावकरांकडून भाजपसाठी बहुमत मागून जळगावकडेच दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आणि भाजपमधील गटातटाचे राजकारण वाढतच राहिले. त्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस आमदार सुरेश भोळे यांनी स्थायी समिती सभापती पदाकरिता राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव पुढे केल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अनेक नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्याचीही तयारी केली होती. भाजपने स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेस व्हीप बजावून भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही ही नाराजी शमली नसल्याने नितीन बरडे यांना मतदान करण्याबाबत काही नगरसेवकांनी निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून हा वाद शांत केला. यानंतर शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी विद्युत खांबांचे स्थलांतर करण्याबाबत निविदा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मात्र हे काम महावितरणच्या माध्यमातून करण्याबाबत आमदार सुरेश भोळे ठाम होते. तर काही नगरसेवक हे काम महापालिकेच्या माध्यमातून व्हावे यासाठी आग्रही होते. त्याच वेळेस शिवाजीनगरमधील काही नगरसेवकांनी थेट आमदार भोळे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी वाद घातला; आणि याच ठिकाणावरून भाजपच्या फुटीची बीजे रोवली गेल्याची चर्चादेखील सुरू आहे. त्यातच महापौर व उपमहापौर पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. विद्यमान महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी यासाठीही लॉबिंग करण्यात आले. तसेच प्रतिभा कापसे व सुरेश सोनवणे यांच्या नावालादेखील काही नगरसेवकांकडून विरोध करण्यात आला. दोन्ही नावे आमदार सुरेश भोळे यांच्याकडून आली होती. त्यात सुरेश सोनवणे यांच्या नावाला नगरसेवकांचा सर्वाधिक विरोध होता. एकीकडे मुदतवाढीसाठी लॉबिंग तर दुसरीकडे विरोध, अशी भाजपतील असंतोषाची खदखद बाहेर आली. कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, सुनील खडके, भरत कोळी या नगरसेवकांनी फुटीची बीजे रोवून सत्तेचे समीकरण बदलवले; आणि भाजपच्या नेत्यांना ही फूट पाहण्याव्यतिरिक्त काही ठेवले नाही. अडीच वर्षांत शहराचा न बदललेला चेहरामोहरा, रस्ते आणि खड्डे यांच्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या जळगावकर, भाजपतील अंतर्गत गटबाजी, शहरातील समस्यांबाबत व रस्त्यांबाबतचा रोष पाहता ही फूट अटळच होती. त्यात भाजपच्या नेत्यांनी केलेले दुर्लक्ष व अतिआत्मविश्वास या फुटीला कारण ठरले.