बिले नाहीत म्हणून मक्तेदारांचे उपोषण!
By अमित महाबळ | Published: July 17, 2023 07:43 PM2023-07-17T19:43:47+5:302023-07-17T19:44:11+5:30
जिल्ह्यात १५० नोंदणीकृत मक्तेदार आहेत. त्यापैकी १५ ते २० जण बँकांचे थकबाकीदार ठरले आहेत.
जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या कामांची ३०० ते ३५० कोटी रुपयांची बिले अडकून पडल्याने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेल्या मक्तेदारांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व निषेध आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ जळगाव शाखा, जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, जळगाव शाखा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.
मागील दोन वर्षांपासून मक्देरांची बिले अडकून पडली आहेत. आंदोलन, उपोषण केले म्हणजे सरकार थोडीफार रक्कम देते पण संपूर्ण रक्कम मात्र, वळती केली जात नाही. जळगाव जिल्ह्यातील मक्तेदारांचे ३०० ते ३५० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकून पडले आहेत. राज्यात हीच रक्कम १४ हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे थकबाकी मिळावी म्हणून राज्यात एकाच दिवशी उपोषण केले जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, जळगाव शाखेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली.
बँकांचे थकबाकीदार ठरले
जिल्ह्यात १५० नोंदणीकृत मक्तेदार आहेत. त्यापैकी १५ ते २० जण बँकांचे थकबाकीदार ठरले आहेत. बिले निघत नसल्याने बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित झाले आहेत. त्यांची वाहने जप्त झाली आहेत. जीएसटी व आयकर (आयटी) विभागाच्या रकमा भरू शकत नाहीत. या आर्थिक संकटामुळे ते व्यवसायातून बाहेर निघाले आहेत. शासनाने मक्तेदारांच्या समस्येचा विचार करून थकित बिले अदा करावीत, अशी मागणी विलास पाटील यांनी केली आहे.