एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यातील बेकी पुन्हा समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:27 PM2018-07-22T12:27:46+5:302018-07-22T12:28:52+5:30
अंतर्गत स्पर्धा
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर मुक्ताईनगरात झालेल्या विजयाच्या जाहिरातीत महाजन यांना स्थान देण्यात आले नाही. यावरुन खडसे-महाजन यांच्यातील बेकी पुन्हा एकदा समोर आली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
गिरीश महाजन यांच्यासह सर्व मुख्य पदाधिकारी हे खडसे यांंना नेते म्हणत असले तरी त्यांना तो मान अनेकदा मिळत नसल्याने खडसे गटाकडून नाराजीही वेळेवेळी उमटली आहे. तर महाजन यांनी अनेक ठिकाणी आपलेच वर्चस्व दर्शविले आहे. या दोघा नेत्यांमधील सूप्त स्पर्धेमुळेच या दोघांमध्ये बेकी निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.
आताचेच उदाहरण म्हणजे जळगावची मनपा निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असा प्रश्न उपस्थित होत असताना सुरुवातीपासूनच महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतही खडसे यांंना दूर ठेवले गेले. या निवडणुकीचे पूर्ण नेतृत्व महाजन यांच्याकडेच आले. खडसे यांनी ८ जागांवर काही कार्यकर्त्याची नावे सुचवली होती परंतु ६ जागाच त्यांच्या मान्य करण्यात आल्या. एकीकडे नेते म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचे ऐकायचे नाही, यामुळे खडसे यांचा गट नाराज होत असून आपसातील कडवटपणा हा वाढतच चालला आहे.
जाहिरातीतून ऐकमेकांना ठेवले दूर
एप्रिल महिन्यात जामनेर पालिका निवडणुकीत भाजपाने १०० टक्के यश मिळविले. जामनेर भाजपाच्या आभाराच्या जाहिरातीत पंतप्रधान ते पालकमंत्री व खासदार यांचे फोटो घेण्यात आले मात्र एकनाथराव खडसेंचा फोटो टाळण्यात आला होता. तर आता मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिलेल्या जाहिरातीत पालकमंत्र्यांचा फोटो आहे, परंतु जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो नाही, याची चर्चा होताना दिसत आहे.
महाजन यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, ही मागणी एकनाथराव खडसे यांनीच सुरुवातीपासून केली. त्यानंतर विधानसभेत हा ठरावही झाला. मात्र गिरीश महाजन यांनी सरकारचे आभार मानणाऱ्या जाहिरातीत केवळ स्वत:चा फोटो झळकवून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.