जीएसटी अधिकारी बनून तोतयाच उद्योजकांना मागायचा ३० लाख
By विलास.बारी | Published: September 1, 2023 11:26 PM2023-09-01T23:26:46+5:302023-09-01T23:27:12+5:30
सापळा रचला अन् जाळ्यात पकडला, दिले पोलिसांच्या ताब्यात
विलास बारी
जळगाव : जीएसटी विभागाचा निरीक्षक असल्याचे सांगत उद्योजकांना वेगवेगळी भीती दाखवत त्यांच्याकडे २० ते ३० लाखांची मागणी करणाऱ्या तोतया जीएसटी अधिकाऱ्याला उद्योजकांनीच पकडले. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेले वाहन घेऊन हा तोतया अधिकारी कंपन्यांमध्ये जाऊन धमक्या देत होता. त्याच्यावर संशय आल्याने त्याला पकडून शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तो भाऊसाहेब ठाकरे असे त्याचे नाव सांगत आहे.
गेल्या काही वर्षांपासून जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन उद्योजकांच्या कागदपत्रांची पाहणी करीत एक अधिकारी उद्योजकांना वारंवार त्रास देत असे. त्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी हा अधिकारी उद्योजक अशोक मुंदडा यांच्या कंपनीत येऊन कागदपत्रांची पाहणी केली. नाशिक येथील अधिका-याच्या नावाने तडजोडीची मागणी केली. त्यासाठी त्याने थेट ३० लाख रुपये मागितले. त्याच्यावर संशय आल्याने मुंदडा हे सावध झाले. तो तोतया अधिकारी शुक्रवारी पुन्हा येणार असल्याने त्यांनी अन्य उद्योजकांना बोलवून ठेवले होते. शुक्रवारी हा तोतया महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेली कार (क्र. एमएच १९, सीवाय ००२५) घेऊन कंपनीत पोहचला. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून देतो, असे सांगितले. त्या वेळी त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता तो ते दाखवू शकला नाही. त्या वेळी त्याची उलट तपासणी केली असता तो माहिती देऊ शकला नाही.
मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट
तोतया अधिकारी असल्याचा संशय आल्याने त्याच्या मोबाईल व कारची तपासणी केली असता त्याच्या कारमध्ये अनेक कागदपत्रे सापडली. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या उद्योजकांकडे पैशांची मागणी केल्याचे चॅटमधून समोर आल्याचे मुंदडा यांनी सांगितले. उद्योजकांनी या तोतया अधिकाऱ्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिस संबंधिताची चौकशी करीत आहेत.