तरुणांनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक नागरिक व्हा : डॉ.अशोक जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:15 PM2018-02-27T15:15:26+5:302018-02-27T15:15:26+5:30
तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून त्यामुळे रोजगाराच्या मोठया संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अशोक जोशी यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि .२७ : तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून त्यामुळे रोजगाराच्या मोठया संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अशोक जोशी यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार, २७ रोजी पार पडला. यावेळी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना डॉ.अशोक जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते.
डॉ.जोशी यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले की, जगात गरीबी कमी होत आहे, माणसाचे आयुर्मान वाढले आहे, जीडीपी वाढला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. वीज सर्वत्र उपलब्ध होत आहे. सौरऊर्जेची किंमत कमी होत आहे. शेतीतील तंत्रज्ञान वाढले आहे. हे सगळे बदल केवळ तंत्रज्ञानामुळेच होत असून पुढील दहा वर्षात आपला मोबाईल दहा लाख पटीने शक्तीमान होईल. चालकाविना गाडी चालेले. गतीमान संगणक येत आहेत. रोबोटने माणसाची जागा घेतली आहे. तंत्रज्ञानाच्या या घोंघावणाज्या वादळात रोजगाराची खूप मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात दीक्षांत मिरवणूकीने सभामंडपात अतिथींचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणूकीच्या अग्रभागी सहायक कुलसचिव शरद जोशी होते. दीक्षांत मिरवणूकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते.
यावेळी गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले. या पदवीप्रदान समारंभात ३५ हजार १६४ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये २२२ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.