जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून पांडव व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:46+5:302021-06-23T04:11:46+5:30

वार्तापत्र महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून फुटून गेलेले नगरसेवक व भाजपमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपामध्ये ...

Become a Pandava by developing Hastinapur in the form of Jalgaon | जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून पांडव व्हा

जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून पांडव व्हा

Next

वार्तापत्र

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून फुटून गेलेले नगरसेवक व भाजपमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपामध्ये आता दोन्ही गट एकमेकांना कौरव-पांडवांची उपमा देत आहेत. बंडखोर नगरसेवक शहराच्या विकासासाठी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे सांगत आहेत. तर भाजपकडून या नगरसेवकांवर केवळ स्वत:चा विकास करण्यासाठी पक्षाविरोधात गेल्याचा आरोप केला जात आहेत. बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये अन्याय झाल्याने पक्षांतर करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे सांगत, भाजपच्या विद्यमान नेत्यांनी कौरवांप्रमाणे आमच्यावर अन्याय केल्याचा आरोपही बंडखोरांनी केला आहे. आता जळगाव महापालिकेच्या कुरुक्षेत्रावर दोन्ही गट एकमेकांसमोर आले असले तरी या लढाईत पराभव हा जळगाव शहरातील नागरिकांचाच होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण,हे नगरसेवक मग बंडखोर असोत वा सेना-भाजपचे असो, कधीही शहराच्या विकासासाठी एकमेकांशी भांडलेले दिसून येत नाहीत. ज्या पांडवांची उपमा घेण्यासाठी बंडखोर व भाजपचे नगरसेवक पुढे येत आहेत. त्या पांडवांनी मरुस्थल असलेल्या खांडवप्रस्थला आधी इंद्रप्रस्थ करून दाखविले होते. मगच त्यांनी कौरवांना रणांगणात आव्हान दिले होते. मात्र, जळगाव शहरात वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. जळगाव शहर जे कधी इंद्रप्रस्थ होते ते आज खांडवप्रस्थ होण्याच्या मार्गावर असताना याठिकाणचे लोकप्रतिनिधी मात्र स्वत:चीच थोरवी गाण्यात मश्गुल आहेत. जळगावकरांना सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, धूळ, चिखलाच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत असे असताना पांडव कोण आणि कौरव कोण ? यामध्ये शहराचे लोकप्रतिनिधी गुंतले आहेत. अडीच वर्षात भाजपला शहराच्या विकासासाठी बोंब पाडता आली नाही, आणि बंडखोर देखील त्या सत्तेत सहभागी होते. त्यामुळे त्यावेळेसही बंडखोरांनाही आवाज उठविता आला नाही. आवाज उठविला तो केवळ ठेक्यांसाठी. त्यामुळे शहरातील कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधींना पांडव होण्याचा हक्कच नाही. मात्र, येणाऱ्या काळात जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून दाखवतील त्यांनाच जनताही आपल्या मनात पांडवांचा दर्जा देईल. मात्र, शहराचे खांडवप्रस्थ राहिल्यास, मनपाच्या कुरुक्षेत्रावर बंडखोर, भाजप व सेनेच्या नगरसेवकांना नागरिकांशीच दोन हात करण्याची वेळ येईल.

Web Title: Become a Pandava by developing Hastinapur in the form of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.