दारूबंदीसाठी महिला बनल्या आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:36 AM2018-07-12T01:36:08+5:302018-07-12T01:36:42+5:30
चोपडा तालुका : महिलांच्या विशेष ग्रामसभेत एकमुखी निर्णय, पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील कठोरा येथील महिलांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करीत गावात दारूबंदीचा एकमुखी निर्णय घेतला. ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, दारूबंदी विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
गावात गावठी दारू अगदी सहज प्रत्येक भागात आठ ते दहा ठिकाणी अगदी उघड्यावर विकली जाते. यातूनच दारू पिणाºयांची संख्या गावात वाढत होती. यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले होते. याचा कहर म्हणजे तरुण पिढी व कोवळी मुलेसुद्धा दारूच्या आहारी जातानाचे चित्र दिसत होते. याचा फटका अनेकांना बसत होता. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत सरपंच अश्विनी रवींद्र पाटील यांच्याकडे गावात दारूबंदी करण्याचा प्रस्ताव आणला. त्यास त्यांनी तत्काळ अनुमती दर्शवित महिलांची विशेष ग्रामसभा ९ रोजी संध्याकाळी चार वाजता सरपंच अश्विनी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यात गावातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला. यात दारूमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत असून, आता हे बस झाले. यापुढे गावात दारू विक्री नकोच. विकणाºयाला तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन करावे व भावी पिढी या दुष्टचक्रात अडकू नये, अशा भावना महिलांनी यावेळी व्यक्त करीत दारूबंदीचा एकमुखी ठराव केला.
ठरावाच्या प्रती प्रशासनाकडे
या ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक, दारूबंदी विभाग जळगाव यांना स्वत: ग्रामस्थांनी जाऊन दिल्या व यात जातीने लक्ष घालून दारूबंदी करावी, असे सांगितले.
सभेत एक समिती गठित करण्यात आली, ती यावर देखरेख ठेवेल. त्या समितीचे अध्यक्ष सरपंच अश्विनी रवींद्र पाटील, उपाध्यक्ष रामदास कोळी, सदस्य म्हणून भरत पाटील, अरुण धनगर, रवींद्र पाटील, अरुण पाटील, देवराम पानपाटील, मुरलीधर पाटील , व पोलीस पाटील आनंदा पाटील यांचा समावेश आहे.
ग्रामसभेत सरलाबाई कुसुमबाई लक्ष्मण भिल, कोमलाबाई आनंदा पानपाटील, छायाबाई गौतम पानपाटील, मंगलबाई उत्तम भिल, विजया मधुकर पाटील, अरुणाबाई इघन देवरे, जिजाबाई विठ्ठल चांभार, आशा रमेश पाटील, मंगलाबाई मच्छिंद्र धनगर, पमाबाई देविदास कोळी, रेखा गोकुळ पाटील, सरलाबाई भास्कर कोळी, आशा सुरेश सैंदाने, भुराबाई रमेश पाटील, मायाबाई रमेश कोळी, सरला भीमराव पानपाटील आदींह तिनशेवर महिलांचा समावेश होता, अशी माहिती ग्रामसेवक राजेंद्र पवार यांनी दिली.