वर्णनात्मक लेखन जास्त असल्याने बीएडचा पेपर तीन तासांचा होणार

By अमित महाबळ | Published: July 19, 2023 07:10 PM2023-07-19T19:10:46+5:302023-07-19T19:10:57+5:30

बी. एड. अभ्यासक्रमाचा पेपर सोडविण्यासाठी यापुढे तीन तासांचा वेळ मिळेल.

BEd paper will be of three hours duration as descriptive writing is more | वर्णनात्मक लेखन जास्त असल्याने बीएडचा पेपर तीन तासांचा होणार

वर्णनात्मक लेखन जास्त असल्याने बीएडचा पेपर तीन तासांचा होणार

googlenewsNext

जळगाव : बी. एड. अभ्यासक्रमाचा पेपर सोडविण्यासाठी यापुढे तीन तासांचा वेळ मिळेल. वर्णानात्मक लेखन जास्त असल्यामुळे वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने याची दखल घेतली. विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.

मंगळवारी, विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक झाली. त्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. बी.एड. परीक्षेसाठी अडीच तासांऐवजी तीन तास वेळ वाढवून देण्यास विद्या परिषदेने मान्यता दिली. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात वर्णनात्मक लेखन जास्त करावे लागत असल्यामुळे तीन तासांचा वेळ परीक्षेसाठी द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत अभ्यास मंडळाने विद्या परिषदेकडे शिफारस केली होती.
 
कोविडमध्ये विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव राहिला नाही. त्यानंतर झालेल्या परीक्षांमध्ये पेपर सोडविण्यासाठी वेळ पुरत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे अर्धा तास वाढवून द्यावा, अशी त्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या विद्या परिषदेने निर्णय घेतला आहे. खान्देशात २८ महाविद्यालये असून, बी.एड., बी.पीएड.च्या १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे आंतरविद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांनी सांगितले.  

बी.एड.च्या विद्यार्थ्यांना पूर्वी १०० गुणांच्या पेपरसाठी तीन तास मिळायचे. ८०-२० पद्धतीत अडीच तास देण्यात आले. मात्र, परीक्षेत वर्णनात्मक लेखन अधिक करावे लागत असल्याने वेळ पुरत नव्हता. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून आलेले विद्यार्थी असतात. प्रत्येकाची लेखनाची गती कमी-जास्त असते. त्यामुळे सर्व उत्तरे माहित असूनही काही विद्यार्थ्यांचा अडीच तासात पेपर सोडवून व्हायचा नाही. त्यामुळे वेळ वाढवून मिळावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती, असे सद्गुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी सांगितले.

Web Title: BEd paper will be of three hours duration as descriptive writing is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.