जळगावात वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:07+5:302021-06-25T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वटपौर्णिमेच्या पूजेत दिवे लावल्यानंतर झाडावर असलेल्या मधमांशानी पूजेसाठी आलेल्या २० ते २५ महिलांवर थेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वटपौर्णिमेच्या पूजेत दिवे लावल्यानंतर झाडावर असलेल्या मधमांशानी पूजेसाठी आलेल्या २० ते २५ महिलांवर थेट हल्ला चढविल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यात एक महिला थेट बेशुद्ध पडल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
काशीबाई उखाजी कोल्हे शाळेसमोरील वडाच्या झाडाजवळ बसून २० ते २५ महिला पूजा करीत होत्या. पुजाऱ्यांनी दिवे पेटविल्यानंतर झाडावर असलेल्या मधाच्या पोळ्यापर्यंत हा धूर पोहचला. त्यात अचानक या पोळ्याचा काही भाग थेट जिजाबाई श्याम भालेराव (४०) यांच्या अंगावर पडला. यात त्यांना अन्य महिलांच्या तुलनेत अधिक मधमाशांनी चावा घेतला. यात त्या जखमी झाल्या. यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे व प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी सांगितले.
अन्य महिला खासगी रुग्णालयात
यातील अन्य महिलांना कमी प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला होता. त्यातील काही घरी परतल्या तर काही महिलांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती आहे. जिजाबाई या त्यांच्या सुनेला घेऊन पूजेसाठी आलेल्या होत्या. मात्र, त्यांच्यावरच या मधमाशांनी हल्ला चढविल्याने त्या थेट बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना जीएमसीत दाखल करण्यात आले.