मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वी राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By विलास.बारी | Published: June 27, 2023 03:06 PM2023-06-27T15:06:36+5:302023-06-27T15:07:32+5:30
पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना ताब्यात घेतले.
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कापूस भाव, जिल्ह्यातील ठप्प झालेली विकासकामे, पाणीटंचाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आदी विषयांवरून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि. २७) दुपारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना ताब्यात घेतले.
कापूस भावासंदर्भात ठोस भुमीका घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार दुपारी १ वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, वंदना पाटील यांच्यासह कार्यकर्ते जमा झाले. ही बाब माहित झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयातून काळे झेंडेदेखील जप्त करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख शरद तायडे, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, राहुल पारचा, श्रीकांत आगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.