‘अंतर्नाद’तर्फे आजपासून पुष्पांजली प्रबोधनमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 05:14 PM2019-08-22T17:14:48+5:302019-08-22T17:16:14+5:30
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे.
भुसावळ, जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे.
प्रथम पुष्प चिनावल (ता.रावेर) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २३ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिकचे हास्य कलावंत प्रमोद अंबडकर हे गुंफतील. ‘चाल दोस्ता तुला आपला गाव दाखवतो’ हा त्यांचा विषय आहे. चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर बोरोले अध्यक्षस्थानी असतील. विशेष अतिथी म्हणून कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ जावळे तर प्रमुख पाहुणे रावेर पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, सरपंच भावना बोरोले असतील.
द्वितीय पुष्प यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगावचे साहित्यिक मनोहर आंधळे हे गुंफतील. ‘कविता बोलते युवकांच्या काळजाशी’ हा विषय ते मांडतील. प्राचार्य डॉ. एफ. एम. महाजन अध्यक्षस्थान भूषवतील. यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिरालाल चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे प्रमुख पाहुुणे असतील.
तृतीय पुष्प रावेरच्या सरदार जी.जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे २६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता चांदवडचे कवी, गायक विष्णू थोरे हे गुंफतील. ‘जाणिवा समृद्ध करणाऱ्या गावशिवच्या कविता’ हा त्यांचा विषय आहे. रावेर शिक्षण हितवर्धक संस्थेचे चेअरमन प्रकाश मुजूमदार अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश धनके, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर महाजन, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, चोपड्याचे डॉ.विलास पवार, रावेर शेतकरी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील हे असतील.
साहित्यिक विद्यार्थ्यांच्या भेटीला
साहित्यिकांशी ओळख व्हावी, वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठानने ही प्रबोधनमाला विद्यार्थी रसिक डोळ्यासमोर ठेवून सुरू केली आहे. श्रोत्यांपर्यत वक्त्याला घेऊन जाणे असा हा आगळा वेगळा उपक्रम आहे. यशस्वीतेसाठी अध्यक्ष संदीप पाटील, संयोजक प्रा.डॉ.जतीन मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर घुले, प्रकल्पप्रमुख संजय भटकर हे परिश्रम घेत आहेत.