जळगावात महापौरपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:57 PM2018-08-07T12:57:20+5:302018-08-07T12:59:39+5:30
जळगाव मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे.
जळगाव : मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे. तर ऐनवेळी पक्षाच्या आदेशानुसार इतर नावाला देखील महापौरपदासाठी अंतीम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्तांकडून महापौर किंवा उपमहापौर निवडीसाठी कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. साधारणपणे १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान, महापौरपद निवडीसाठी विशेष महासभा होण्याची शक्यता आहे. त्याआधी महापौरपदासाठी भाजपामध्येच रस्सीखेच सुरु झाली आहे.
इच्छुकांकडून पक्षनेतृत्वावर महापौरपदासाठी दबाव टाकण्यासाठी नगरसेवकांचे समर्थन प्राप्त करण्यासाठी धावपळ सुरु आहे. सीमा भोळे यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्यासाठी त्यांचे पती व शहराचे आमदार सुरेश भोळे हे आग्रही आहेत. तर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे या देखील या स्पर्धेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या कैलास सोनवणे यांच्याकडून सुरुवातीपासून महापौरपदासाठी दावा ठोकला जात आहे. यासाठी त्यांनी काही नगरसेवकांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सिंधूताई कोल्हे या ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांना देखील पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.
महापौरपदासाठी वाढणाऱ्या स्पर्धेमुळे पक्ष नेतृत्वाकडून काही इच्छुकांना सम-समान संधी दिली जाण्याची शक्यता. मात्र, यासाठी देखील स्पर्धा सुरु असून पहिली संधी मिळण्यावर इच्छुकांचा भर आहे. इच्छुकांकडून काही नगरसेवकांना आपल्या बाजुने करून वरिष्ठांशी याबाबत बोलणी देखील सुरु केल्याचे समजते.
महापौरपदासह उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठीही इच्छुकांकडून ‘फिल्डींग’ लावली जात आहे. उपमहापौर पदासाठी भगत बालाणी, सदाशिव ढेकळे यांचे नाव आघाडीवर असून, स्थायी समिती सभापतीसाठी आश्विन सोनवणे, शुचीता हाडा यांचे नाव आघाडीवर आहे. यासह स्विकृत नगरसेवक पदासाठीही हालचाली सुरु आहेत.