मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजनेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:20 PM2018-11-28T15:20:04+5:302018-11-28T15:24:06+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यास सुरुवात झाली असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी करण्यात आली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यास सुरुवात झाली असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी करण्यात आली.
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती व्हावी, नोंदणी कशी व कुठे करावी, काय-काय लाभ या योजनेतून मिळतात, याकरिता अनुलोम संस्थेमार्फत बांधकाम कामगार नोंदणी जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात सरकारी कामगार अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी अनुलोमचे मुक्ताईनगरचे भाग जनसेवक दिनेश चव्हाण यांच्याकडे बांधकाम नोंदणी अर्ज सुपूर्द करून केली. या वेळी टाकळी येथील २६ इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०१८ पर्यँत विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. या योजनेत २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे गेल्यावर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकचे सत्यप्रत, पासपोर्ट छायाचित्र लागते. या अभियानातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यावर भर देण्यात येत आहे.
यावेळी सहायक नोंदणी अधिकारी अ.फु.चव्हाण, अनुलोम रावेर उपविभाग जनसेवक मनोज महाजन उपस्थित होते. अभियान यशस्वीतेसाठी अनुलोम वस्तीमित्र राजू चव्हाण, स्थानमित्र जितेंद्र जाधव, राहुल जाधव आदी परिश्रम घेत आहेत.