भाजपच्या वाटेवर असल्याने आ. चिमणराव पाटील यांचे पालकमंत्र्यांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:08+5:302021-07-05T04:12:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आ. चिमणराव ...

Being on the path of BJP. Chimanrao Patil's allegations against the Guardian Minister | भाजपच्या वाटेवर असल्याने आ. चिमणराव पाटील यांचे पालकमंत्र्यांवर आरोप

भाजपच्या वाटेवर असल्याने आ. चिमणराव पाटील यांचे पालकमंत्र्यांवर आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आ. चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवाल उपस्थित करून आ. पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये आहे, त्यांना भाजपमध्ये जायचे असल्यानेच ते अशा प्रकारचे आरोप करताय, असा टोला राष्ट्रवादीचे माजी आ. सतीश पाटील यांनी लगावला. रविवारी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन पक्षाने मागे घेतले असून त्यांना पक्षात घेण्यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २०१४ च्या निवडणुकीत आपला पराभव शक्य नव्हता, तो घडवून आणला असे वक्तव्य आ. चिमणराव पाटील यांनी केल्यानंतर याचे खंडण करणे गरजेचे असल्याचे सांगत, वय ७० पेक्षा अधिक वाढल्याने मानसिक संतुलनही अधिक बिघडते, असा टोला सतीश पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय, जि. प. सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आ. पाटील यांची झोप का उडाली, असा सवाल त्यांनी यावेळी केला. दरम्यान, महागाईविरोधात प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीचे आंदोलन होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विनोद देशमुख यांना ऑक्टोबर २०२० मध्ये पक्षाने निलंबित केले होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या. मात्र, पक्षात अनेकांना प्रवेश देत असताना चुका सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे, त्यामुळे देशमुखांचे निलंबन मागे घेण्यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला, असे सतीश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अनुपस्थितीवरून त्यांना पत्रकार परिषदेचा निरोप मिळाला नसेल, त्यांनाही कामाची संधी आहे त्यांनी काम करावे, असे सतीश पाटील म्हणाले.

पक्षाध्यक्षांना दिले पत्र

एरंडोल-पारोळा तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात असून आघाडी धर्म हा केवळ राष्ट्रवादीनेच पाळावा का? याबाबत आपण पक्षाध्यक्षांना पत्र पाठविल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही एकच नेता व एकच संघटना यानुसार वेगवेगळी भूमिका मांडू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

शाई प्रकरणाची मागितली माफी

आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावरील फोटोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणे हे चुकीचे आहे. शेवटी पदाचा मान राखला पाहिजे. मात्र, लोकांना जेव्हा त्रास होतो, त्या त्रासातून काही गोष्टी घडत असतात. मात्र, या प्रकाराची आम्ही माफी मागतो, असे सतीश पाटील म्हणाले.

Web Title: Being on the path of BJP. Chimanrao Patil's allegations against the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.