लोकसहभागातून ‘बेलगंगे’च्या सहा शाळा झाल्या डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:24 PM2019-07-24T16:24:05+5:302019-07-24T16:24:48+5:30
बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वाघडू, बोरखेडा, वडाळा, प्रिंपी, बेलगंगा व कोठली या सहा माध्यमिक शाळा लोकसहभागातून १०० टक्के डिजिटल शाळा झाल्या आहेत.
चाळीसगाव, जि.जळगाव : बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वाघडू, बोरखेडा, वडाळा, प्रिंपी, बेलगंगा व कोठली या सहा माध्यमिक शाळा लोकसहभागातून १०० टक्के डिजिटल शाळा झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी यांच्या गुणवतेत निश्चित वाढ होईल, असा सूर २३ रोजी वाघडू येथे झालेल्या कार्यक्रमात निघाला.
अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक शंकर बारकू पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एम. के. पाटील, उद्योजक सुयोग जैन, विश्वस्त प्रा.एस.डी.पाटील, एल.टी. पाटील, जीभाऊ पाटील, देवराम पाटील, आर.सी.पाटील, नाना ढगे, आबा पाटील, उपसरपंच मधुकर पाटील, व्यंकटराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील भालेराव यांनी केले. दीपप्रज्वालन व सरस्वती पूजन प्रमुख अतिथींनी केले. उद्योजक सुयोग जैन म्हणाले की, अनेक लोक मंदिरासाठी देणगी, वर्गणी गोळा करतात हे आपण ऐकले आहे परंतु, ज्ञानमंदिरासाठी जनतेतून पैसा उभा केल्यामुळे भावी पिढी अधिकाधिक शिक्षित होऊन त्यांच्या आयुष्याला टर्निंग पार्इंट मिळणार आहे. त्यामुळे मदत करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
एम.के.आण्णा पाटील म्हणाले की, या शाळांमध्ये डिजिटल साधनांचा वापर होऊन इ-लर्निंगसह विविध सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण विध्यार्थी आता गुणवतेत मागे पडणार नाही. त्यामुळे तो शहरातही जाणार नाही.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल आबा पाटील, प्रा.एस.डी.पाटील, व्यंकटराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, पालक, शिक्षक वर्ग उपस्थित होते.