बेलगंगेचे बॉयलर उद्या पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:16 AM2018-11-11T01:16:00+5:302018-11-11T01:19:24+5:30
गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेला चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर सोमवार १२ रोजी पेटणार आहे.
चाळीसगाव : गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर सोमवारी पेटणार असून परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेल्या सहा महिन्यापासून कारखान्याचे यंत्र दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. सोमवारी सकाळी ११ वाजता बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा होत असल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.
बेलगंगा साखर कारखान्याला जिल्हा बँकेने दहा वर्षापूर्वी मालकी म्हणून टाळे लावले होते. मात्र चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून ४० कोटी रुपये उभे करुन कारखाना विकत घेऊन भूमिपुत्रांची मालकी प्रस्थापित केली. यामुळेच चाळीसगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून बेलगंगेच्या चिमणीतून धूर निघण्याची प्रतिक्षा केली जात होती.
गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यात रोलसह, बॉयलर व विजपुरवठा विभागाचे कामकाज केले जात होते. हे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने ते पुर्ण झाले. कारखान्याने सहा कोटी रुपये ऊसतोड मजुरांना अदा करुन करारही केला आहे. गिरणा परिसरात गाळपासाठी लागणारा ऊसही उपलब्ध असल्याने दरदिवशी २५०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले जाणार आहे.
तीनशे कामगारही असून ऊस उत्पादकांना परजिल्ह्यात ऊस विकण्याच्या त्रासातून देखील सुटका होणार आहे. कारखाना नावावर लागण्याच्या प्रक्रियेत हरकतींच्या सुनावणीमुळे वेळ गेला. त्यामुळेच बॉयलर पेटण्यास एक महिना उशीरच झाला असून लवकरच गव्हाणीत ऊस मोळी टाकण्याचा सोहळा होऊन प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली जाणार असल्याचेही चेअरमन पाटील यांनी सांगितले.