कोरोनामुक्त गावातील शाळांची घंटा खणखणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:12+5:302021-07-07T04:19:12+5:30

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष ...

The bells of schools in the Coronamukta village will ring | कोरोनामुक्त गावातील शाळांची घंटा खणखणणार

कोरोनामुक्त गावातील शाळांची घंटा खणखणणार

googlenewsNext

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, अनेक ठिकाणी लाट निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसे परिपत्रक सरकारने सोमवारी जाहीर केले आहे.

राज्यातील कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी तेथील ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा ठराव मंजूर करावयाचा आहे. हा ठराव पालकांशी चर्चा करून नंतरच करायचा आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे, असे शासनाच्या पत्रकात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त आहेत. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शाळांना हे नियम असतील बंधनकारक

- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी असावेत.

- विद्यार्थ्यांनी सतत हात धुवावेत, मास्कचा वापर करावा. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवावे आणि त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, आदी बाबींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे.

- शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने मुलांना शाळेत बोलावण्यात यावे. विविध सत्रांत वर्ग भरवावेत.

- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषक काळजी घ्यावी.

- पालकांनी आजारी किंवा लक्षण असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये.

- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.

- विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

- शाळेचा परिसर दररोज नियमित स्वच्छ केला जावा.

- वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे जिने, स्वच्छतागृहे आदी भाग यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम

शाळा बंद आणि मुले घरी राहण्याने मुलांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकात नमूद केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होत आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे सोशलायझेशन होत नसल्याने त्यांच्या सामाजिक कौशल्यांचे नुकसान होत आहे. इंटरनेट, मोबाइलचा गैरवापर, गेम्सचे व्यसन, मानसिक तणाव, बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट अशा विविध प्रकारे मुलांचे नुकसान होत असल्याने त्यांना नियमित शिक्षण मिळावे म्हणून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे या पत्रकात म्हटले आहे.

शिक्षकांना करावी लागणार चाचणी

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तसेच शाळेच्या दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळेच्या कार्यक्रमांवर निर्बंध

परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम, ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनांवर कडक निर्बंध असणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी पालकांनीदेखील शक्यतो स्वत:च्या वैयक्तिक वाहनाने पाल्यास शाळेत सोडण्याचेही पत्रात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे कोरोनामुक्त

जळगाव जिल्ह्यातील १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त झाली आहेत. ७० गावांमध्ये तर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ तसेच शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडूनसुद्धा होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असेही पालकांचे म्हणणे आहे.

Web Title: The bells of schools in the Coronamukta village will ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.