माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला, फिर्याद दाखलचे खंडपीठाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:38 PM2019-05-04T17:38:03+5:302019-05-04T17:39:18+5:30
पोलिसांवर टाळाटाळचा आरोप : आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ९ जणांविरुद्ध तक्रार
चाळीसगाव : माजी सैनिक सोनू हिंमत महाजन यांच्यावर ३ वर्षांपूर्वी तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात पोलिसांना फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. यानुसार मारहाण प्रकरणात आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ९ जणांचा समावेश असल्याची तक्रार ३० एप्रिल रोजी माजी सैनिक महाजन यांच्या पत्नीने पोलिसात दिली आहे. या तक्रारीमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे.
या घटनेबाबत दिलेल्या तक्रारीनुसार माहिती अशी की, २ जून २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजता टाकळी प्र.चा. येथील सोनू महाजन यांच्या घरी घरमालक मुकुंद भानुदास कोठावदे, भावेश मुकुंद कोठावदे, भारती मुकुंद कोठावदे, पप्पू मुकुंद कोठावदे, लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ, आमदार उन्मेष पाटील हे आलेत. आणि सोनू महाजन यांना म्हणाले की, आमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करतो का, असे म्हणून त्यांनी महाजन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. त्यावेळी आमदार उन्मेष पाटील यांनी भावेश कोठावदे यास उद्देशून म्हणाले की, मारून टाक या सोन्याला, असे सांगताच भावेश कोठावदे याने त्याच्या हातातील तलवारीने सोनू महाजन यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर भावेश कोठावदे याने मनीषा सोनू महाजन यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची ३३ हजार २०० रुपये किमतीची सोन्याची पोत काढून घेतली व मुकुंद कोठावदे याने महाजन यांच्या खिश्यातील २ हजार ७०० रुपये काढून घेतले. आमदार उन्मेष पाटील या सर्वांना मारहाण करण्यासाठी प्रोत्साहन देत होते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
महाजन यांनी आरडाओरड केली असता रस्त्यावरील आजूबाजूचे लोक धावून आले. गर्दी वाढू लागल्याने सर्व जण घटनास्थळावरून निघून गेले. तसेच जाताना बबड्या शेख व भूषण उर्फ शुभम बोरसे याने मनीषा महाजन यांच्या मालकीची दुचाकी गाडीही चोरून नेली.
या घटनेची फिर्याद मनीषा महाजन यांनी त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी त्यांची फिर्याद घेण्यास नकार दिला. परंतु सोनू महाजन यांच्या डोक्यावर मार लागल्याने त्यांना दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी मेडिकल मेमो पोलिसांनी दिला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करून घेतले. दरम्यान मनीषा महाजन यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांना त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आदेश असूनही तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला नाही व टाळाटाळ केली.
याउलट, दुसऱ्या दिवशी ३ जून २०१६ रोजी मारहाण प्रकरणातील मुकुंद भानुदास कोठावदे यांच्या फिर्यादीवरून जखमी सोनू महाजन, किसनराव जोर्वेकर यांच्याविरुध्द खोटा गुन्हा पोलिसांनी दाखल करुन घेतला होता. ग्रामीण रुग्णालयात महाजन उपचार घेत असताना संबंधित डॉक्टरांनी त्यांना धुळे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यासाठी मेमो दिला होता. परंतु जखमी सोनू महाजन यांना धुळे येथे न दाखल करता चाळीसगाव पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयातूनच जखमी अवस्थेतून त्यांना अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींनी मारहाण करूनही संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला नाही. उलट आपल्यावरच खोटा गुन्हा दाखल केला म्हणून सोनू महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती.
अद्याप फिर्याद दाखल नाही
याबाबतची सुनावणी औरंगाबाद खंडपीठात ८ एप्रिल २०१९ रोजी झाली. त्यावेळी खंडपीठाने असा आदेश दिला की, ३० एप्रिल २०१९ रोजी फिर्यादीने साक्षीदारांसह पोलीस स्टेशनला फिर्याद द्यावी. त्यानुसार सोनू महाजन व त्यांची पत्नी मनीषा सोनू महाजन यांनी साक्षीदारांसह पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांची भेट घेऊन लेखी फिर्याद दिली. पोलिसांनी मनीषा महाजन व साक्षीदारांचे जाबजबाब घेतल्यानंतर तक्रारदार व साक्षीदार यांना अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस उपअधीक्षक नजिर शेख यांच्याकडे निरीक्षण व चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. दरम्यान, तक्रार देऊन ३ दिवस उलटूनही प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींविरुध्द पोलिसात शुक्रवार सायंकाळीपर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
मारहाण प्रकरणातील सोनू महाजन यांची पत्नी मनीषा महाजन यांनी ३० रोजी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. हे प्रकरण अभिप्रायसाठी जिल्हा सरकारी वकील यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. संबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल.
- विजय ठाकुरवाड
पोलीस निरीक्षक, चाळीसगाव
या प्रकरणात मला राजकीय द्वेषातून गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात काहीही तथ्य नाही. केवळ या माध्यमातून चुकीचे आरोप आणि तक्रार करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे.
- उन्मेष पाटील, आमदार