संजय गांधी निराधार योजनेचे यावलला १३ हजारावर लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 05:59 PM2019-09-08T17:59:03+5:302019-09-08T18:00:32+5:30
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे यावल तालुक्यात १३ हजार १७३ लाभार्थी आहेत.
यावल, जि.जळगाव : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे यावल तालुक्यात १३ हजार १७३ लाभार्थी आहेत. महाराष्ट्र शासनाने येत्या आॅक्टोबर महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्र्थींना प्रति महिना एक हजार रुपये देण्यात येणार असल्याचा आदेश कार्यालयास प्राप्त झाला असल्याचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी सांगितले.
तहसीलदार कुवर यांनी सांगितले की, निराधारासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या १३ हजार १७३ लाभार्र्थींंना पुढील महिन्यापासून प्रतिमाह एक हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. या लाभार्र्थींंमध्ये विधवा महिलांना एक हजार मानधन, महिलेस एक अपत्य असल्यास अकराशे रुपये, दोन अपत्य असल्यास बाराशे रुपये मानधन मिळणार आहे. याकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांनी स्थानिक पातळीवर आपल्या गावातील तलाठ्याकडे आधार कार्डाची झॅरोक्स प्रत, अपत्यांच्या जन्माची नोंद दाखले, बँकेच्या पासबुकची झॅरोक्स प्रत तत्काळ जमा करावी तर अपंग लाभार्र्थींनी आपला अपंगत्वाचा दाखला सोबत आधारकार्ड, बँकेचे पासबुक तत्काळ आॅनलाईन करावे, अशी माहिती तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी दिली. यावल तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्र्थींना दर महिन्यास ८५ लाख रुपयांचे मानधन वितरीत करण्यात येते. आता शासनाने लाभार्र्थींचे मानधन एक हजार रुपये केल्याने वितरीत होणारे मानधन हे आता एक कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.
शासनाने नव्याने वाढवून दिलेले एक हजार रुपयांचे मानधन हे पात्र लाभार्र्थींपर्यंत पोहोचावे यासाठी तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, संजय गांधी निराधार योजना विभागाचे अव्वल कारकून रवींद्र मिस्त्री, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हे प्रयत्नशील आहे. त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी व समितीच्या सदस्यांचे सहकार्य मिळत आहे.