आत्मनिर्भर योजनेचा १० हजार लोकांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:13 PM2020-06-27T16:13:59+5:302020-06-27T16:14:15+5:30
जामनेर तालुका: रेशन कार्ड नसलेल्यांना तांदुळ वाटप
जामनेर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्थापित मजूर व रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ व प्रती कुटंब एक किलो हरभऱ्याचे वाटप सुरू केले आहे. याचा तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे अधिक हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यात अनेकांचे रेशनकार्ड नसल्याने अन्नधान्यासाठीही त्यांची फरफट होत आहे. काही सामाजिक संस्थाकडून मदतीचा हात देण्यात आला, मात्र आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांच्या समस्या कायम आहेत. त्यात परजिल्ह्यातील व परराज्यातील विस्थापित मजुरांची संख्याही मोठी आहे. ही बाब पाहता शासनाच्या वतीने यापूर्वी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय कुटुंब लाभार्थी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने आता आत्मनिर्भर भारत वित्तीय साहय्य पॅकेज अंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरजूंना प्रती किलो पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो हरभरा वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन, जुलै, या दोन महिन्यांसाठी हे धान्य पुरवठा करण्यात येत आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांची महसूल प्रशासनाने निवड केली असून तालुक्यातील रेशनकार्ड नसलेले व विस्थापित मजूर असे जवळपास १० हजार नागरिकांना याचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा फक्त तांदूळ महसूल प्रशासनाकडे उपलब्ध झालेला आहे. शहरातील दोन स्वस्त धान्य केंद्र व तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयमार्फत हे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. तांदूळ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी स्वस्तधान्य दुकानांना भेटी देत आहेत. धान्याच्या वितरणाचा आढावाही घेतला जात असून धान्याबाबत काही तक्रारी असतील तर संपर्क साधावा असे आवाहनही महसूल विभागाने केले आहे.
आधारमुळे मिळणार खºया लाभार्थ्यांना धान्य...
धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकानुसार थम घेतले जाणार आहे थम प्रक्रियेत ज्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी संलग्न केलेला नाही किंवा ज्यांना यापूर्वी लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थींची माहिती मिळणार आहे, आधार लिंकिंगमुळे खºया गरजू लाभार्थ्यांना या धान्याचे वाटप होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना वाटप करण्यासाठी अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला आहे आत्मनिर्भर योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. आत्मनिर्भर योजनेतील लाभार्थ्यांनी आपापल्या हद्दीतील दुकानांमधून तांदूळ घ्यावा.
-अरुण शेवाळे, तहसीलदार जामनेर