वरणगावी शिवभोजन थाळी केंद्रात महिन्यात ३७५० गरजूंना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:48+5:302021-06-05T04:12:48+5:30
महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी वरणगावात महाराष्ट्र शासनाचा गरीब व गरजूंसाठी उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळी ...
महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी वरणगावात महाराष्ट्र शासनाचा गरीब व गरजूंसाठी उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन झाले होते. मेच्या पहिल्या महिन्यातच या शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून वरणगाव व परिसरातील गोरगरीब, कष्टकरी आणि हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी हे शिवभोजन थाळी केंद्र मोठा दिलासा ठरत आहे.
येथील बसस्टॅन्ड चौकात, हॉटेल अमृततुल्य येथे दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी केंद्रावर दररोज स्त्री, पुरुष, मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक अशा १२५ गरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचे वाटप केले जाते.
वरणगावसाठी शिवभोजन थाळी केंद्रावर शासनाकडून फक्त १०० थाळीला परवानगी दिली आहे. तरी, दररोज १२५ थाळीवाटप करण्यात येते. शहराची लोकसंख्या ५० हजारांवर आहे. ही लोकसंख्या लक्षात घेता थाळीसंख्या वाढवून मिळावी, अशी अपेक्षा केंद्र संचालक संतोष माळी यांनी व्यक्त केली.