जमीन संपादनासाठी संरक्षणात कार्यवाही करून घरकुलांचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:00+5:302021-08-14T04:22:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत शासन नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही एक महिन्याच्या आत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत शासन नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. बेघरांना घरकुले मिळण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जमिनीचा ताबा ग्रामपंचायतीकडे न दिल्यास, तो घेण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी संरक्षणात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कठोरा येथील गावठाण विस्ताराबाबत शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, सरपंच सत्त्वशील पाटील, उपसरपंच सरलाबाई सपकाळे, रामचंद्र सोनवणे, समाधान पाटील उपस्थित होते.
३५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न
२०२२ पर्यंत पात्र शेतमजूर, भूमिहीन व बेघरांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्याने संबंधित शेतकऱ्यांना अजून ८ दिवसांची संधी देऊन जमीन ताब्यात देण्याबाबत त्यांना माहिती द्यावी तसेच संबंधितांनी त्यानंतरही जमिनीचा ताबा ग्रामपंचायतीकडे न दिल्यास, जमिनीचा ताबा घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी संरक्षणात आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.