राष्ट्रीय चेस चॅम्पियनशिपमध्ये बंगालची मृत्तिका, दिल्लीचा दक्ष ठरला चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:15 PM2024-01-04T21:15:00+5:302024-01-04T21:15:31+5:30
गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता ताणून धरली होती.
जळगाव : अनुभूती निवासी शाळेत सुरु असलेल्या सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेची अकरावी आणि अंतिम फेरी गुरूवारी खेळवण्यात आली. अंतिम फेरीच्या मुलांमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीच्या दक्ष गोयल याने साडे आठ गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. तर मुलींमध्ये पच्छिम बंगालच्या अग्रमानांकित असलेली खेळाडू मृत्तिका मल्लिक हिने ९ गुणांसह निर्विवादपणे विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. यावेळी मुलांमध्ये द्वितीय जिहान शाह (गुजरात), तृतीय सम्यक धारेवा (बंगाल), चौथे पारस भोईर (महाराष्ट्र) यांनी स्थान पटकावीले. तर मुलींमध्ये द्वितीय स्नेहा हालदार (बंगाल), तृतीय संनिधी भट (महाराष्ट्र), चौथे स्थान शुभी गुप्ता (उत्तर प्रदेश) यांनी पटकावले.
गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता ताणून धरली होती. एक एक सामना महत्वाचा असल्याने सर्व खेळाडूंनी आपल्या बुद्धिचातुर्याने ही स्पर्धा चपळाईने खेळून काढली. काहींना निराशा तर काहींनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवत स्पर्धेत अग्रस्थान गाठले. समारोपाप्रसंगी आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधत विजयी खेळांडूना शुभेच्छा दिल्या तर विजय मिळवून शकलेल्या खेळांडूना धिर देत हरणे जिंकणे हा खेळाचा भाग आहे. त्याला खिलाडूवृत्तीने घ्यायला शिका. आणि पुढच्यावेळी तितक्याच जोमाने तयारी करून स्पर्धेत उतरा असे मार्गदर्शन केले. यावेळी चिफ अरबिटर देवाशीष बरुआ यांनी ही स्पर्धेचा सार मांडला. तर काही पालकांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सर्व सामन्यांचे पंच यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या समारोप सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष व महाराष्ट्रचेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशचे अध्यक्ष अतुल जैन, चीफ अरबीटर देवाशीष बरुआ (कोलकाता), महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे तसेच आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गादीया, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार अरविंद देशपांडे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव निनाद पेडणेकर, अहमदनगर जिल्हा चेस सर्कलचे सचिव यशवंत बापट व पालघर जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार विवेक उधारे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुभूती निवासी स्कुलचे विद्यार्थी आदित्य सिंह व आरव मिश्रा यांनी केले तर आभार अंकुश रक्ताडे यांनी केले.