जळगावात पार पडलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेची ‘बेरीज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 06:26 PM2017-11-26T18:26:37+5:302017-11-26T18:27:14+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये जळगाव येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या राज्यनाटय़ स्पर्धेतील प्राथमिक फेरीत पार पडलेल्या नाटकांचा नाटय़ समीक्षक डॉ.शमा सुबोध सराफ यांनी घेतलेला आढावा.
यंदा जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीत 14 नाटय़प्रयोग झाले. एकंदरच स्पर्धेतील सादरीकरणाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. वृत्तपत्रांनी आणि सोशल मीडियाने आवजरून या गोष्टीची दखल घेतली. नवनवीन संकल्पना साकारणारे, नवे तरुण कलावंत यावर्षीच्या राज्य नाटय़ स्पर्धेने जळगावला दिले आहे. स्पर्धेचा चढता आलेख पाहता निश्चितच या वेळी पारितोषिकांसाठी चुरस राहणार आहे. गेल्या 56 वर्षापासून हौशी नाटकांची स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या स्पर्धेतूनच आतापयर्र्त अनेक कलावंत, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ घडले. मोठे झाले. फक्त हौशी न राहता नाटकाच्या मार्गाने सिनेमा, टीव्ही आणि शॉट फिल्म, डॉक्युमेंटरी विषयांकडे वळले. एका अर्थाने ही स्पर्धा कौशल्य विकास कार्यशाळाच ठरली आहे. जळगावच्या संदर्भात बोलायचे तर एम.जे. कॉलेजमध्ये सुरू झालेल्या नाटय़शास्त्र विभागामुळे या स्पर्धेत तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध, नाटकांचे प्रमाण वाढले. या नाटय़स्पर्धेत सादर होणा:या नाटकांच्या निमित्ताने काही नाटककार, काही अनुवादक तर काही त्याही पुढे जाऊन पटकथाकार झाले आहेत. या स्पर्धेने नाटय़चळवळीला सर्वागाने बळ दिले. राज्य नाटय़ स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना आपापल्या गावातल्या कलावंतांचे नाटक बघण्याची सवय लावली. हौशी संस्थेची नाटके एका अर्थाने पुण्यामुंबईच्या नाटकांना पर्याय म्हणून उभी राहिली. त्यांनी रसिकांच्या नाटय़ जाणिवा समृद्ध करण्यासाठी, या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचा हातभार लावला. रंगकर्मी विनोद ढगे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. त्यांनी व सहका:यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे बाहेरगावाहून येणा:या स्पर्धकांची कुठलीही गैरसोय झाली नाही. जळगाव केंद्राचे सोशल मिडिया पेज, जळगाव केंद्रावर होणा:या प्राथमिक फेरीकरिता फेसबुकवर ‘राज्य नाटय़ जळगाव’ या नावाने पेज बनविण्यात आले आहे. या पेजवर सादरीकरण झालेल्या नाटकाविषयी विविध वृत्तपत्रांतून आलेली समीक्षणे, नाटकाची मोजकी छायाचित्रे, काही प्रसंगांची चित्रफीत तसेच संघातील लेखक, दिग्दर्शक व कलावंत यांच्या एकंदर स्पर्धे- संबधित मुलाखती घेण्यात येतात. या सोशल मीडिया पेज जळगावातील रंगकर्मी योगेश शुक्ल हे अपडेट ठेवत असतात. यानिमित्ताने सुसंवाद सुरू झाला आहे. त्यावर काल एक चांगली चर्चा परिवर्तन टीमने पुढाकार घेऊन घडवून आणली. हा सुसंवाद यापुढे आणखी वाढेल. राज्य नाटय़च्या टिमकडूनही आयोजक, परीक्षक, समन्वयक यांच्यापुरता संवाद मर्यादित न राहता, या स्पर्धेचा महत्त्वाचा कणा असलेल्या स्पर्धक संघांच्या प्रमुखाला किंवा दिग्दर्शकालाही त्यात सहभागी करून घेतले तर या रंगमैत्रीची वीण अधिक घट्ट होईल, हे नक्की.