नवीन रुग्णसंख्या वाढू न देणे हाच सर्वोत्तम पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:15 AM2021-04-19T04:15:04+5:302021-04-19T04:15:04+5:30
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत ...
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत वेळीच तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. नवीन रुग्णसंख्या वाढू न देणे यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या व त्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन व इतर औषधी यांची उपलब्धता यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती देत कोरोना नियंत्रणासाठी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले.
१५ हजार रुग्णांवर एकाच वेळी उपचार शक्य
कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज ११ हजार सक्रिय रुग्ण असून त्यादृष्टीने बेड, ऑक्सिजन व औषधी याविषयी नियोजन केले जात आहे. यामध्ये बेडचा प्रश्न मार्गी लागला असून एकाच वेळी १५ हजार रुग्ण उपचार घेऊ शकतात, एवढी क्षमता झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यात ऑक्सिजन बेडचीदेखील अडचण नाही, मात्र कधी-कधी व्हेंटिलेटरचा प्रश्न उपस्थित होतो. त्यावरही बेड मॅनेजमेंटच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बेड उपलब्ध झाले असले तरी ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक असल्याने त्याची बचत करणे महत्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादनच कमी झाल्याने त्याचा पुरवठा कमी असल्याने त्याविषयीदेखील रुग्णालयांना सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाढत्या रुग्ण संख्येने मनुष्यबळाचाही प्रश्न
कोरोनाचे रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास ऑक्सिजन, रेमडेसिविरसह मनुष्यबळाचीही कमतरता भासू शकते, अशी शक्यता वर्तवित पुढील धोके टाळण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिबंधात्मक उपाय हाच उपचार
गेल्या वर्षापेक्षा आता कोरोनाचा संसर्ग गंभीर असून यामध्ये तरुणांनाही त्याची लागण होत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे टाळले पाहिजे तसेच थोडेही लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे. अनेक ठिकाणी टायफाईडचा आजार म्हणून उपचार करून घेतले जात आहे. मात्र तसे न करता वेळीच तपासणी करावी आणि पुढील ऑक्सिजन व इतर औषधोपचारासाठी होणारी धावपळ तसेच गंभीर होण्याची स्थिती टाळता येऊ शकते, असे जिल्हाधिकार्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी देखील माहिती देत ४५ वर्षाच्या पुढील सर्वांनी लसीकरण करून घेत धोका टाळावा असे आवाहन केले. लसींच्या उपलब्धतेनुसार सर्वांना लसीकरण केले जाणार असून असल्याचे त्यांनी सांगितले.